,

शिर्डी : विधानसभा निवडणुकीतील प्रचंड यशाने भाजपची उमेद वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुकांपासूनच स्वबळावर वाटचाल सुरू केली जाण्याचे संकेत आहेत. भाजपने दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले असून एक कोटी २८ लाखांचा टप्पा गाठला आहे. पक्षाची ताकद वाढल्यावर सहकारी पक्षांची फारशी गरज उरणार नाही, अशी भाजपची रणनीती आहे. त्यामुळे संघटनबळ वाढवून स्वबळाच्या दिशेने वाटचाल करण्याचे दिशादर्शन येथील महाविजयी मेळाव्यातून करण्यात येणार आहे. भाजप २०२४ च्या निवडणुका महायुतीत तर २०२९ च्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या वर्षी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली होती.

हेही वाचा >>> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?

भाजपची वाटचाल त्या दृष्टीने सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा किमान २०-२५ लाख मते जास्त मिळाली, म्हणजे प्रत्येक मतदान केंद्राच्या क्षेत्रात २०-२५ मतदार भाजपने वाढविले तर यश मिळेल, असे नियोजन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि २०२९ मधील लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने आता आपले बळ आणखी वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी भाजपने गेल्या आठवडाभरापासून संघटनपर्व अभियान सुरू केले असून त्यात ५० लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. भाजपने आधीच एक कोटी सदस्य जोडले असून ही संख्या दीड कोटीवर नेण्याचा संकल्प आहे. नव्याने सुरू केलेल्या अभियानात २७-२८ लाख सदस्य नोंदणी झाली असून त्याला आणखी वेग देण्यात येणार आहे.

नड्डा अनुपस्थित

राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे दिल्ली विधानसभा निवडणुकीत व्यग्र असल्याने अधिवेशनास उपस्थित राहणार नाहीत. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राज्यभरातून येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींनी मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन सदस्य नोंदणी वाढविण्यासाठी नियोजनाचा आढावा घेण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> सोलापूरच्या चादर व्यवसायाचे पानिपत!

प्रदेशाध्यक्षपद तूर्तास बावनकुळेंकडेच

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. ‘एक व्यक्ती, एक पद’ या सूत्रानुसार नवीन अध्यक्षांच्या नावाची घोषणा या अधिवेशनानिमित्ताने होणे अपेक्षित होते. आमदार रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. तेव्हा त्यांची लवकरच प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे आश्वासन वरिष्ठ नेत्यांनी दिले होते, पण तालुका, जिल्हा पातळीवर संघटनात्मक निवडणुका पार पडल्यावर प्रदेशाध्यक्ष व मुंबई अध्यक्षांची निवड होणार आहे. यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या, तर तूर्तास बावनकुळे व शेलार यांच्याकडेच सूत्रे राहण्याचे संकेत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केल्याने आभार मानण्यासाठी हे अधिवेशन आहे. संघटनपर्व अभियान सुरू असून दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट आहे. ते आम्ही निश्चितपणे साध्य करू. – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष

Story img Loader