एखाद्या वेडय़ा माणसाला प्रत्येक गोष्ट हवी असते तसे वेड महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंना लागले असल्याचे सांगतानाच लोकसभेची निवडणूक लढवून ते मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहू लागले असल्याची टीका राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी पारनेर येथे केली. छोटय़ा पक्षांना संपवण्याचे भाजपचे धोरण असून महाराष्ट्रात शिवसेनेला संपविण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचेही ते म्हणाले.
नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कराव जाधव होते. पालकमंत्री मधुकर पिचड, आ. बबनराव पाचपुते, माजी खासदार दादा पाटील शेळके, उमेदवार राजीव राजळे, घनश्याम शेलार, दादा कळमकर, सुजित झावरे, काशिनाथ दाते, उदय शेळके आदी या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून उधळलेला मोदींचा अश्वमेघ संत ज्ञानेश्वरांपासून चोखामेळय़ापर्यंतची भूमी, समाजसुधारकांचा महाराष्ट्र रोखण्याचे काम करणार आहे. गुजरातच्या विकासाच्या मॉडेलचा आज प्रचार केला जात आहे. आम्हाला गुजरातचे मॉडेल हवे, परंतु महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेलांच्या गुजरातचे मॉडेल हवे आहे. नरेंद्र मोदींच्या विकासाचे मॉडेल आम्हाला नको. जातिजातींमध्ये तेढ निर्माण करणारे, धर्माधर्मात संघर्ष निर्माण करणारे, देशात भीतीचे वातावरण निर्माण करणारे मॉडेल देशाच्या हिताचे नाही. ज्या राज्यात अल्पसंख्याकांना जिवंत जाळले जाते ते मॉडेल देशाचा एकसंघपणा टिकवू शकत नाही. महाराष्ट्र गुजरातच्या पाचपट पुढे असून दरडोई उत्पन्न, स्थूल उत्पन्न, साक्षरता, विदेशी गुंतवणूक, औद्योगिक विकास, रोजगार क्षमता आदींच्या बाबतीत कशात गुजरात पुढे आहे हे भाजपच्या लोकांनी एका व्यासपीठावर येऊन सिद्घ करावे असे आव्हान त्यांनी दिले.
गोपीनाथ मुंडे स्वत:ला फार लोकप्रिय व हुशार समजतात. युतीच्या काळातही ते भ्रष्टाचाराचे आरोप करीत होते. एन्रॉनला समुद्रात बुडवू म्हणणाऱ्यांनी समुद्रात बुडवून तीनपट मोठा करून महाराष्ट्राच्या माथी मारला. आता तुमच्यावर जनता विश्वास ठेवील का, असा सवाल करून कधी कृषी, कधी संरक्षणमंत्री होण्याच्या गप्पा मारणारे मुंडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याच्याही वल्गना करीत आहेत. उभे राहिलेत लोकसभेला व स्वप्न पाहतात विधानसभेचे असे सांगतानाच जे काय असेल ते मीच होणार अशी त्यांची भूमिका आहे अशी टीका पाटील यांनी केली.
शिवसेनेला संपवण्याचे भाजपचे धोरण- आर. आर. पाटील
एखाद्या वेडय़ा माणसाला प्रत्येक गोष्ट हवी असते तसे वेड महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंना लागले असल्याचे सांगतानाच लोकसभेची निवडणूक लढवून ते मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहू लागले असल्याची टीका राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मंगळवारी पारनेर येथे केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-03-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp policy is destroying shiv sena r r patil