अलिबाग : एकेकाळचे देशातले सुसंकृत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख होती. या सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख पुसण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले. केवळ सत्ते करता भाजपने महाराष्ट्राची ओळख पुसून टाकली. येवढे नीच आणि स्वार्थी राजकारण राज्याने आजवर पाहिले नव्हते, म्हणून याचा राग चीड संताप संपुर्ण महाराष्ट्राला आहे. म्हणून यांची निवडणूका घ्यायची हिंमत होत नाही. लोकसभेच्या निवडणूका पुढे ढकलता येत नाहीत. नाहीतर भाजपने त्याही पुढे ढकलल्या असत्या असा घणाघाती आरोप उध्दव ठाकरे गटाचे शिवसेना नेते अनंत गीते यांनी केला. ते अलिबाग येथे उबाठा गटाच्या शिवसेना तालुका पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख विष्णू पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख अमीर ठाकूर, सतिश पाटील, तालुकाप्रमुख शंकर गुरव, विशाखा पोटफोडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता होती. सरपंचांपासून पंतप्रधानांपर्यंत काँग्रेसची सत्ता होती. पण त्यांनी येवढे नीच राजकारण केले नाही. भाजपने सत्तेसाठी घराघरात वाद लावले, कुटूंबात फूट पाडली, काका पुतण्यात वाद लावले, विरोधी पक्षात फूट पाडली. येवढे खालच्या पातळीचे राजकारण महाराष्ट्राने कधीच पाहीले नव्हते. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणूकीत भाजपला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. यासाठी विरोधकांची एकी महत्वाची आहे. म्हणून विधानसभा असो अथवा लोकसभा या निवडणूका इंडीया आघाडीच्या माध्यमातूनच लढल्या गेल्या पाहीजेत. त्यासाठी आपआपसातील मतभेद विसरून एकत्र यायला हवे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पाच राज्याचे निकाल नुकतेच लागले. तीन राज्यात भाजपची सत्ता आली, एका राज्यात काँग्रेस तर एका राज्यात स्थानिक पक्षांची सत्ता आली. पण या निवडणूकीत भाजपला ४१ टक्के मतं पडली. तर काँग्रेसला ३९ टक्के मतं मिळाली. फरक हा दोन टक्क्यांचा आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची एकजूट झाली तर भाजप पराभव निश्चित आहे. ५९ टक्के मतं ही भाजपच्या विरोधात आहे. त्यामुळे इंडीया आघाडीचे असणे महत्वाचे आहे. १२० सामाजिक आणि आदिवासी संघटनांनी उध्दव ठाकरे यांना पाठींबा जाहीर केला आहे. मुस्लिम समाजही त्यांच्या बरोबर येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत भाजपच्या भ्रम निश्चित फूटेल असेही ते म्हणाले. जनता आपली चीड, संताप नक्की मतपेटीतून व्यक्त करेल.

रायगड, मावळ या दोन्ही लोकसभा मतदारसंघासह नऊ विधानसभेचे आमदार इंडीया आघाडीचे निवडून आणायचे आहेत. यासाठी शिवसैनिकांची ताकद महत्वाची आहे. कालपर्यंत काय झाले ते विसरा, मतभेद, अहंकार बाजूला ठेऊन निवडणूकीच्या तयारीला लागा असे आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. इंडीया आघाडीला संधी आहे. भाजप यावेळी लोकसभेच्या २५० जागाही जिंकू शकणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, विष्णू पाटील यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

Story img Loader