ईडीनं शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर टाच आणल्यानंतर त्यावरून मोठं राजकारण पाहायला मिळालं. त्यानंतर झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसंदर्भातील व्यवहारावरून आरोप केले आहेत. यावरून राजकारण तापलेलं असताना आता भाजपानं संजय राऊतांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. तसेच, दिल्लीत झालेल्या शरद पवार-नरेंद्र मोदी भेटीबाबत देखील भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आयएनएस विक्रांतसंदर्भात केलेल्या टीकेनंतर भाजपा नेते प्रसाद लाड यांनी प्रतिहल्ला चढवला आहे. “संजय राऊतांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना गेट वेल सूनच सांगावं लागेल. ज्या प्रकारे राऊत आरोप करत आहेत, त्या आरोपांमध्ये तथ्य नाहीत. किरीट सोमय्यांनीही सांगितलंय की मुख्यमंत्र्यांना कागदपत्र देऊन माझ्यावर कारवाई करा. त्यामुळे राऊत आणि गँग किरीट सोमय्यांना फसवण्याचं काम करत आहे. पण न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे”, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

“ती’ भेट गांभीर्याने घेण्याची गरज नाही”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेली भेट गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं प्रसाद लाड म्हणाले आहेत. “त्या भेटीला गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्यावरून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. भाजपा राष्ट्रवादीसोबत कदापि जाणार नाही. भाजपाच्या सरकारकडून महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराची बाहेर काढली जाणारी प्रकरणं दडपण्यासाठी पवार भेटले असतील. याव्यतिरिक्तही राज्य सरकारची कामं पंतप्रधानांकडे असू शकतात. त्यामुळे त्याला राजकीय अर्थ काढून महत्त्व देण्याची गरज नाही”, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

शरद पवारांची पंतप्रधानांशी नेमकी काय चर्चा झाली? अजित पवार म्हणाले, “मला आणि दिलीप वळसे पाटलांना…!”

“शिवसेनेसोबत काँग्रेस-राष्ट्रवादीचेही आमदार संपर्कात!”

दरम्यान, शिवसेनेसोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेही नाराज आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे. “शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दल असलेली नाराजी, हिंदुत्वाचा सोडलेला मुद्दा, काँग्रेस-एनसीपीच्या मांडीवर बसून मराठी मुद्द्याला दिलेली बगल, आमदारांची न होणारी कामं, पालकमंत्र्यांची मनमानी यामुळे आमदार नाराज आहेत. त्या नाराज आमदारांची आमच्याशी चर्चा होत आहे. शिवसेनेसोबतच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नाराज आमदारांशी आमची चर्चा सुरू आहे”, असा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे.