भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा अनेक अर्थांनी चांगलाच गाजला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने अनेक नाट्यमय घडामोडी सध्या राज्यात घडताना पाहायला मिळत आहेत. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून याविषयी अनेक प्रतिक्रिया आणि आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका करत काही गंभीर आरोप केले आहेत. “१०० ते १५० चा पोलीस फौजफाटा सोमय्यांच्या घराबाहेर कोणतंही कारण नसताना लावला गेला. सोमय्या काय अतिरेकी किंवा गुन्हेगार आहेत का?”, असा सवाल दरेकर यांनी केला आहे. याचसोबत, “सोमय्या यांचा घातपात करण्याचा देखील प्रयत्न होता असा मोठा संशय मला आहे”, असंही दरेकर यावेळी म्हणाले.

प्रवीण दरेकर यांनी आज (२० सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “जो घडला तो प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही. जो तमाशा झाला तो अत्यंत अयोग्य आहे. १०० ते १५० चा पोलीस फौजफाटा किरीट सोमय्यांच्या घराबाहेर कोणतंही कारण नसताना लावला गेला. याशिवाय, कराडला जाईपर्यंत त्यांना नजरकैदेप्रमाणे पोलिसी फौजफाट्यात नेण्यात आलं आहे. पण, असं करायला सोमय्या काही अतिरेकी नाहीत किंवा गुन्हेगार नाहीत”, असं म्हणत दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचसोबत, “सरकारमधील विसंवादामुळे, सरकारच्या चुकीमुळे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपल्या एवढ्या वैभवशाली पोलीस खात्याचे धिंडवडे निघत आहेत. यामुळे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात संताप निर्माण झाला आहे”, असंही दरेकर म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“सोमय्यांचा घातपात तर करायचा नव्हता ना?”

“किरीट सोमय्या भावना गवळी यांच्या संदर्भांत वाशिममध्ये गेले होते. तिथे किरकोळ दगडफेक झाली. अनिल परबांच्या संदर्भात रत्नागिरीत देखील सोमय्या गेले होते. पण दोन्ही ठिकाणी ते सुरक्षित जाऊन परत आले. मग इथे कोल्हापुरातच असं नेमकं काय आहे की हसन मुश्रीफांना त्या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरवायला लागला? म्हणूनच इतक्या मोठ्या गर्दीमार्फत सोमय्यांचा घातपात तर करायचा नव्हता ना?” असा मोठा संशय आपल्या मनात असल्याचं देखील प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवलं. यावेळी, दरेकर यांनी कलेक्टर ऑर्डरचा संदर्भ दिला. त्याचसोबत, या अनुषंगाने देखील चौकशी होण्याची आवश्यकता असल्याची मागणीही त्यांनी केली आहे.

“कर नसेल तर डर कशाला?”

“हसन मुश्रीफांनी दिलेलं आव्हान भाजपाने स्वीकारलं आहे. मात्र, त्यांनी भाजपावर अ‍ॅक्शन घेणं आधीच सुरु केलं आहे. परंतु, संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. कर नसेल तर डर कशाला?”, असंही यावेळी प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत, ठाकरे सरकारमधील विसंवाद देखील चव्हाट्यावर आल्याचं दरेकर म्हणाले. “एकीकडे संजय राऊत म्हणतात की, सोमय्यांच्या कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना काहीच माहिती नाही. त्याचवेळी, गृहमंत्री म्हणतात की, ही जिल्हाधिकारी स्तरावरची कारवाई आहे. पण अशा प्रकारच्या कारावायांचं ब्रिफींग मुख्यमंत्र्यांना होत असतं हे लक्षात घ्यायला हवं”, असंही दरेकर म्हणाले. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp praveen darekar questions criticizes thackeray government kirit somaiya gst