काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात फोन टॅपिंग प्रकरणी तीव्र आक्षेप घेत खळबळ उडवून दिली होती. त्या मुद्द्यावरून राजकारण सुरू असतानाच राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्या हालचालींवर पाळत ठेवत आहेत या नाना पटोलेंच्या आरोपांवरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केल्यानंतर आता विरोधकांनी देखील नाना पटोलेंना टोला लगावला आहे. राज्याच्या विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नाना पटोलेंवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
नाना पटोले येतात जोरात, पण…!
नाना पटोलेंची वादग्रस्त वक्तव्य आल्यानंतर शिवसेनेचे अरविंद सावंत, उपमुख्यमंत्री अजित पवार, नवाब मलिक यांनी त्यांच्या विधानांचा समाचार घेतला. त्यासंदर्भात बोलताना प्रविण दरेकर म्हणाले, “नाना पटोलेंनी एकदाच नाही, तर अनेक वेळा तलवार म्यान केली आहे. रोज मरे, त्याला कोण रडे अशी अवस्था नाना पटोलेंची झाली आहे. ते येतात जोरात. कदाचित त्यांच्या भावना खऱ्या असतील. त्यामुळे त्यांनी त्या ताकदीने मांडल्या. पण नंतर अजित पवारांची नाराजी आणि मुख्यमंत्र्यांनी दट्ट्या दिला असणार”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
जो बूँद से गई, वो हौद से नहीं आती!
दरम्यान, प्रविण दरेकर यांनी नाना पटोलेंसोबतच राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. “सरकार टिकणं ही सगळ्यांची गरज असल्यामुळेच नाना पटोले यांनी आपली तलवार म्यान केली असेल. पण बूँद से गई, वो हौद से नहीं आती है. भावना तर त्यांनी प्रकट केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमध्ये नेमकं काय चाललंय, हे जनतेसमोर आलं आहे. त्यामुळे जे एकमेकांवर विश्वास ठेऊ शकत नाहीत, ते महाराष्ट्राच्या जनतेला काय विश्वास देणार, असं चित्र राज्यात उभं राहाताना दिसत आहे”, असं दरेकर म्हणाले.
आपण काय बोलतोय यांचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेनं नाना पटोले यांना सुनावलं
राज्य नव्हे, केंद्र सरकार म्हणायचं होतं!
नाना पटोले यांच्या वक्तव्यांनंतर महाविकासआघाडीमध्ये नाराजी दिसू लागताच काँग्रेसकडून सारवासारव करण्यात आली आहे. पक्षाच्या बैठकीनंतर महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी “नाना पटोलेंना राज्य सरकार नसून केंद्र सरकार म्हणायचं होतं”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते राज्याच्या दौऱ्यावर असून यादरम्यान त्यांची काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी आज बैठक झाली.
नाना पटोले यांच्या बेताल वक्तव्यांमुळे काँग्रेस नेतेच अस्वस्थ
शिवसेना, राष्ट्रवादीचा संताप
नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर “नाना पटोले यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला एकप्रकारे सुरुंग लावला जातोय. नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाते. त्यामुळे नाना पटोले यांची भूमिका महाविकास आघाडीला कमकुवत करणारी तसेच अडचणीत आणणारी आहे,” अशा शब्दात अजित पवार यांनी आक्षेप घेतला होता. तसेच, “तुम्हाला काही अडचण आहे, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना किंवा बाळासाहेब थोरात यांना सांगा; पण असं वक्तव्य करणं योग्य नाही. अशा लोकांमुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा खराब होणार नाही, याचा विचार केला पाहिजे. त्यांना कसं थांबवायचं हे आता त्याचा पक्ष आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील”, असं अरविंद सावंत म्हणाले होते.