भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंदू व्होट बँकेविषयी केलेल्या विधानाची सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एकीकडे शिवसेनेचे नेते या विधानावरून भाजपावर तोंडसुख घेत आहेत, तर दुसरीकडे भाजपाचे नेते पाटलांच्या या विधानाचं समर्थन करून शिवसेनेवरच पलटवार करत आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर आता भाजपाचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निशाणा साधला आहे.

देशात हिंदू व्होट बँकेचा मुद्दा सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनी मांडला होता, असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी बोलताना केलं होतं. त्यावर बोलताना आता प्रविण दरेकरांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. “हिंदुत्वाची प्रखर जाणीव नक्कीच बाळासाहेब ठाकरेंनी मिळवून दिली. हिंदुह्रदयसम्राट म्हणून देशभरात त्यांना नावलौकिक मिळाला यात दुमत असण्याचं कारण नाही. म्हणून हिंदुत्ववादी विचारधारा घेऊन बाळासाहेबांनी भाजपासोबत युती केली”, असं दरेकर म्हणाले.

“दुर्दैवाने नंतर हिंदुत्वाचा विचार सोडून दिला गेला. ज्यांनी हिंदुत्ववादी विचारधारेला विरोध केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून सत्ता बनवण्यापर्यंत मजल गेली. म्हणून हिंदुत्वाविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला आहे”, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांचं नेमकं विधान काय?

“तिकीट पक्षाचं असतं त्यामुळे माझं तिकीट कापलं हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे. तिकीट पक्षाचं असतं, व्होट बँक पक्षाची असते. तुमचं कर्तृत्व पाहून पक्ष तुम्हाला उमेदवारी देत असतो. व्होट बँक ही वर्षानुवर्षे मेहनत घेऊन तयार केलेली असते. ही व्होट बँक संत, मंहतांपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते. त्यांनी ही हिंदुत्वाची व्होट बँक विकसित केली. अलीकडच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, आडवाणी, नरेंद्र मोदी आणि सर्वांनी त्यावर कळस चढवला. ती व्होट बँक तुम्हाला मिळते, त्यासाठी तुमचा चेहरा, गाव थोडंसं उपयोगी पडतं. अन्यथा ते तिकीटही, उमेदवारही आणि व्होट बँकही पक्षाची आहे,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

“…तेव्हा पळून गेले होते”; शिवरायांनी हिंदू व्होट बँक तयार केली म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर संजय राऊत संतापले

पाटील यांच्या विधानावर दरेकरांचं स्पष्टीकरण

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर प्रविण दरेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “व्होट बँकेचा अर्थ शब्दश: घेऊ नका. एका विचारधारेला मानणारा एखादा वर्ग असाच त्याचा अर्थ होतो. छत्रपतींच्या विचारांना मानणारा वर्ग असा त्याचा अर्थ घेतला पाहिजे. त्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असल्याच्या संदर्भात चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं”, असं दरेकर यावेळी म्हणाले.

Story img Loader