मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनीही चिपळूणचा दौरा करत परिस्थितीची पाहणी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणेदेखील उपस्थित होते. दरम्यान यावेळी एकही सरकारी अधिकारी सोबत नसल्याने नारायण राणेंचा संताप झाला होता. यावेळी एका अधिकाऱ्याला नारायण राणे झापत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर यावेळी मधे बोलू पाहणाऱ्या कार्यकर्त्याला ‘थांब रे, मध्ये बोलू नको’ असंदेखील म्हणाले होते. या संपूर्ण घटनेवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“तळी उचलण्याची सवयच असलेल्यांना…”, नारायण राणे शिवसेनेवर संतापले; मुख्यमंत्र्यांनाही लगावला टोला
“लोकांचा आक्रोश पाहून नारायण राणे संतापले होते. लोकांच्या संतप्त भावना पाहून त्यांनी ती चिड व्यक्त केली,” असं प्रवीण दरेकरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
नेमकं काय झालं होतं –
केंद्रीय मंत्री नारायण राणे चिपळूणच्या पूरग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. एकही सरकारी अधिकारी सोबत नसल्याने सुरुवातीला त्यांनी फोन करुन जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं. जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत सांगत असताना त्यांनी ‘सीएम, बीएम गेला उडत’ असंदेखील म्हटलं. ‘मी येथे बाजारपेठेत उभा आहे. तुमचा एकही माणूस आमच्यासोबत नाही,’ अशा शब्दांत राणेंनी संताप व्यक्त केला.
“करोना, वादळं, पाऊस उद्धव ठाकरेंचाच पायगुण”; नारायण राणेंचा जोरदार हल्लाबोल
दरम्यान यानंतर त्यांनी सर्वांसमोर एका अधिकाऱ्याची कानउघडणी केली. “तुमचा एकही अधिकारी येथे का नाही? लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, ते रडत आहे. विरोधी पक्षाचे नेते येथे आले आङेत. तुम्ही ऑफिसमध्ये काय करताय?,” असं नारायण राणे अधिकाऱ्याला सुनावत असतानाच प्रवीण दरेकरांच्या मागे उभा एक कार्यकर्ता बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यावर नारायण राणे सर्वांसमोर ‘थांब रे, मधे बोलू नको’ असं खडसावतात. यानंतर नारायण राणे पुन्हा अधिकाऱ्याला खडे बोल सुनावण्यास सुरुवात करतात. नारायण राणेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.