राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा अध्यक्षपदावरून चर्चा रंगली आहे. सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अध्यक्षपदावरून मतभेद सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे. काँग्रेसच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्ष काँग्रेसचाच होणार अशी आग्रही भूमिका मांडलेली असताना दुसरीकडे इतर दोन्ही पक्ष देखील यासंदर्भात भूमिका घेताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून या वादावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. “काँग्रेसची राज्यात प्रत्येक टप्प्यावर फरफट होत आहे”, अशा शब्दांत प्रवीण दरेकरांनी निशाणा साधला आहे.
नाना पटोलेंच्या आग्रहाला केराची टोपली
नाना पटोलेंनी विदर्भात अधिवेशन घेण्याच्या मांडलेल्या आग्रही भूमिकेकडे इतर दोन्ही सत्ताधारी पक्ष दुर्लक्ष करत असल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. “काँग्रेसच्या आग्रहीपणाची व्याख्या समजून घ्यावी लागेल. महाविकासआघाडी सरकारमध्ये काँग्रेसची प्रत्येक टप्प्यावर फरफट होत आहे. काँग्रेसला विदर्भात जनाधार आहे. करारानुसार विदर्भात अधिवेशन घेणं क्रमप्राप्त असताना नाना पटोले आग्रही भूमिका मांडतात. पण त्यांच्या आग्रहाला केराची टोपली दाखवण्याचं काम केलं जातं”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
पटोलेंच्या भूमिकेला काडीची किंमत नाही
दरम्यान, नाना पटोलेंच्या भूमिकेला आघाडीमध्ये काडीचीही किंमत नसल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. “ममता बॅनर्जी इथे येऊन काँग्रेसच्या राहुल गांधी वगैरे सर्वोच्च नेत्यांवर टीका करत असताना नाना पटोले भूमिका घेतात. पण त्यांच्या भूमिकेला काडीचीही किंमत शिवसेना किंवा राष्ट्रवादी देताना दिसत नाही. काँग्रेसमुळे सत्तेत आहोत हे माहिती असूनही काँग्रेसला कस्पटासमान लेखण्याचं काम केलं जात आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना आपापली पदं आपापल्या पारड्यात पाडून घेऊन आपला पक्ष भक्कम करत आहेत. त्याचवेळी काँग्रेसची फरफट होत आहे. अध्यक्षपदासाठी नाना पटोले आग्रही असतील, तर त्यांची भूमिका योग्य आहे”, अशा शब्दांत प्रवीण दरेकरांनी काँग्रेसची पाठराखण केली आहे.