BJP President JP Nadda on Rahul Gandhi & Mallikarjun Kharge : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री दिल्लीमधील एम्स रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. डॉ. सिंग यांच्यावर आज, शनिवारी सकाळी ११.४५ च्या सुमारास दिल्लीतील निगमबोध घाट येथे लष्करी तसेच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे अंत्यसंस्कार कुठे व्हावेत? यावरून वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे केंद्र सरकारनं स्मृतीस्थळासाठी जागा देण्याचं मान्य केलं असतानाच दुसरीकडे काँग्रेसकडून मात्र स्मृतिस्थळाच्या ठिकाणीच डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार व्हावेत अशी आग्रही मागणी केली होती.
दरम्यान, यावरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नड्डा म्हणाले, “काँग्रेस खासदार राहुल गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे आज या दुखद प्रसंगी देखील राजकारण करतायत. काँग्रेसने मनमोहन सिंग हयात असताना त्यांना कधी सन्मान दिला नाही. आता त्यांच्या सन्मानावरून राजकारण करतायत. ही तीच काँग्रेस आहे जिने पंतप्रधानपदाची गरिमा धुळीस मिळवली. या काँग्रेसवाल्यांनी सोनिया गांधींना सुपर पीएम म्हणत त्यांना मनमोहन सिंग यांच्यापेक्षा वरचं स्थान दिलं होतं. राहुल गांधींनी सरकारचा अध्यादेश फाडून मनमोहन सिंग यांचा अपमान केला होता. आज तेच राहुल गांधी राजकारण करतायत”.
हे ही वाचा >> प्रकाश आंबेडकरांनी घेतली फडणवीसांची भेट, दोघांमध्ये तासभर चर्चा, कोणत्या मागण्या मान्य केल्या?
जे. पी नड्डा काय म्हणाले?
जे. पी. नड्डा म्हणाले, “गांधी कुटुंबाने देशातील कोणत्याही मोठ्या नेत्याला सन्मान दिला नाही, कोणालाही न्याय्य वागणूक दिली नाही. तो नेता भले काँग्रेसचा असो अथवा विरोधी पक्षातील. बाबासाहेब आंबेडकर, देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, लाल बहादूर शास्त्री, पी. व्ही. नरसिंह राव, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी या सर्वांवर काँग्रेसने अन्याय केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने डॉ. मनमोहन सिंग यांच्यासाठी समाधीस्थळ निश्चित केलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली आहे. असं असूनही काँग्रेस मात्र खोट्या बातम्या पसरवण्यात व्यस्त आहे.”
हे ही वाचा >> “…अन् गोपीनाथ मुंडेंना काँग्रेस प्रवेश करता आला नाही”, अजित पवारांनी सांगितला मनमोहन सिंगांच्या मोठेपणाचा किस्सा
नेमकं प्रकरण काय?
गुरुवारी २६ डिसेंबर रोजी मनमोहन सिंग यांचं निधन झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी काँग्रेस पक्षाकडून केंद्र सरकारला स्मृतीस्थळासंदर्भात पत्र पाठवून विनंती करण्यात आली. केंद्राकडून स्मृतिस्थळासाठी जागा देण्यात न आल्याची तक्रार पक्षाकडून करण्यात आली. त्यावर शुक्रवारी रात्री केंद्र सरकारकडून स्मृतिस्थळासाठी जागा देण्याचं मान्य केल्याचं स्पष्ट करण्यात आलं. काँग्रेसकडून यासंदर्भात विनंती पत्र आलं असून त्यावर निर्णय घेण्यात आला आहे व तो काँग्रेस पक्षप्रमुख आणि डॉ. सिंग यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्रालयानं दिली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतिस्थळासाठी जागा दिली जाईल. पण त्यासाठी ट्रस्ट स्थापन करून पुढील कार्यवाही करावी लागेल. तोपर्यंत त्यांच्यावरील अंत्यसंस्कार व इतर बाबी करता येतील, असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.