महापालिकेत नेतृत्वाला आव्हान, इच्छुकांची संख्या वाढली

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

अत्र, तत्र, सर्वत्र सत्ता या धोरणानुसार भाजपची वाटचाल सुरू असली तरी पक्षातूनच चालत्या गाडीला गुना लागत असल्याचे चित्र दिसत असून जत, कवठेमहांकाळ, सांगली या विधानसभा मतदार संघापाठोपाठ बहुमताने सत्ता काबीज केलेल्या सांगली महानगरपालिकेत सर्व काही अलबेल नाही हे स्थायी सदस्य निवडी वेळी स्पष्ट झाले. भाजपाच्या  दहा सदस्यांनी निवडीला आक्षेप घेत असताना बंडाचा झेंडा जरी अद्याप खांद्यावर घेतलेला नसला तरी सत्तेच्या  नावाने चांगभल असे  ब्रीद असलेल्यांच्या महत्तावकांक्षांना पायबंद कसा घातला जाणार हे विधानसभा निवडणुकीच्या तेंडावर पक्ष नेतृत्वाला एक प्रकारचे आव्हान असणार आहे.

गेल्या वर्षी घाउक आयात करून भाजपाने महापालिकेतून काँग्रेसला हद्दपार करीत सत्ता बळकावली. मात्र सत्तेच्या तराजूत आंबड टाकण्याचे काम करणारी मंडळी ही पूर्वाश्रमीचे काँग्रेसजनच आहेत. त्यांच्या महत्त्वाकांक्षा या सत्तेच्या दावणीला कायम बांधलेल्या असतात. महापालिकेतील संख्याबळ ४३ वर पोहचूनही एक वर्षांच्या कालावधीत प्रभावशाली कामगिरी झाल्याचे दिसत नाही, याउलट महापुराच्या सारख्या भीषण संकटावेळी प्रशासनाची बेदिली सर्वासमोर आली. आपत्ती व्यवस्थापनाचे चार जिल्हय़ाचे केंद्र असलेल्या आणि ३५ लाखांचा निधी हाताशी असतानाही २००५ च्या महापुरानंतर महापालिकेच्या प्रशासनाने धडा घेतला असल्याचे दिसलेच नाही. महापुरासारख्या संकटाच्या काळात काही मंडळी लोकांना दिलासा देण्याचे आणि अन्न, पाणी पुरविण्याबरोबरच वाचविण्याचे काम करीत होती, राजकीय मतभेद महापुराच्या पाण्याबरोबर वाहत गेल्याचे सुखद चित्र दिसत असतानाच महापौरांनी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य मिळाले नसल्याचे सांगत महापालिका प्रशासनाच्या चुकीचे खापर जिल्हा प्रशासनावर फोडण्याचे काम केले.

महापूर ओसरल्यानंतर सर्व काही एकदिलाने घडेल असे वाटत असतानाच स्थायी  सदस्य निवडीवरून अंतर्गत मतभेद उफाळून आले. महापालिकेत भाजपाची सत्ता आणण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सुरेश आवटी गटाने स्थायीसाठी शिवाजी दुर्वे यांच्या नावाचा आग्रह धरला होता, तर समाज कल्याणमंत्री सुरेश खाडे यांनी भाजपचे निष्ठावंत गटाचे पांडुरंग कोरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता, तर उपमहापौर सूर्यवंशी यांच्या गटाकडून यमगर यांचा आग्रह धरण्यात आला होता. ही सर्व आग्रहाची नावे वगळून संधी मात्र दुसऱ्यांनाच मिळाली.

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याच गटाच्या ताब्यात राहाव्यात यासाठी आवटी गटाचा प्रयत्न होता, यातून स्थायी सभापतिपदासाठी दुर्वे यांना संधी मिळावी, त्यांना नाही तर आनंदा देवमाने यांना संधी मिळावी असे प्रयत्न सुरू होते, तर मंत्री खाडे यांचा कोरे यांच्यासाठी आग्रह होता. या सर्वाना टाळून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट महापौरांनाच दूरध्वनीवरून मिरजेतून मोहना ठाणेदार या महिलेचे नाव अंतिम करण्याचे फर्मान काढले. यामुळे सगळेच मुसळ केरात गेले. पक्षाच्या धक्कातंत्राला शह देण्यासाठी आगामी विधानसभेला वेगळा विचार करण्याचा इशारा देण्यात आला.

आता आवटी गटाचे दहा सदस्य निवडीवेळी गैरहजर राहिले. याचा स्थायी सभापती निवडीवेळी परिणाम होण्याची शक्यता वाटत असली तरी त्यालाही पक्षातूनच शह दिला जाण्याची चिन्हे आहेत. सभापती पदासाठी यातीलच गणेश माळी यांना संधी देऊन बंड शमविण्याचे प्रयत्न केले जातील. भाजपच्या जेष्ठ सदस्या भारती दिगडे आणि श्रीमती ठाणेदार यांचीही नावे पर्याय म्हणून पुढे येतील. यामुळे आवटी गटाच्या संभाव्य विरोधाला काटशहाने उत्तर दिले जाईल असे दिसते. तरीही महापौरपदाची पहिली अडीच वर्षे संपल्यानंतर महापौरपद अनारिक्षित झाले तर सत्तेचा खेळ अधिक रोमहर्षक बनणार आहे. त्या वेळी भाजप नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. महापालिकेची सत्ता सूत्रे भाजपचे निष्ठावंत म्हणून गणले जाणारे शेखर इनामदार यांच्याकडे सोपविण्यात आली असली तरी त्यांनाही आमदारकीची स्वप्ने पडू लागल्याने त्यांना प्रदेश उपाध्यक्षपद देऊन पत्ता काटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

एकीकडे महापालिकेत सत्तेचे राजकारण टोकाला गेले असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत बेदिली निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जात असली तरी जत, कवठेमहांकाळमध्ये पडद्याआडच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. जतमधून उमेदवार बदलाची मागणी जोर धरत असून विद्यमान आमदार विलासराव जगताप यांनी वेळोवेळी केलेली वक्तव्ये दखलपात्र ठरल्याची वंदता आहे. विशेषत राजकारणात साधू संन्याशाचे काय काम, असा केलेला सवाल त्यांच्या वाटेतील विघ्न बनत चालला असून पर्याय म्हणून जिल्हा परिषदेचे सभापती तमणगोंडा रवि पाटील, डॉ. रिवद्र आरळी यांची नावे पुढे आहेत. पाटील यांनी उमेदवारी मिळो अथवा न मिळो मदानात उतरण्याची तयारीच केली असून प्रचाराचा पहिला टप्पाही त्यांनी पूर्ण केला आहे. पक्षातूनच निष्ठावंत गटाकडूनही त्यांना पाठबळ मिळत असल्याने जतचे रणमैदान भाजपसाठी आव्हान बनणार आहे, तर कवठे महांकाळचे अजित घोरपडे यांची उमेदवारी अद्याप अंतिम नसल्याचे सांगत खासदार गटाकडून वेगळी व्यूहरचना केली जात आहे.

मतभेद मिटवण्याचे आव्हान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा दहा दिवसांनी होत आहे. या यात्रेच्या निमित्ताने विरोधकाकडे असलेले मतदार संघच लक्ष्य करण्यात आले असून ही यात्रा ज्या मतदारसंघात विरोधकांकडे प्रतिनिधित्व आहे अशा तालुक्यातूनच जाणार आहे. यामध्ये इस्लामपूर, पलूस आणि तासगाव हे मतदारसंघ निवडण्यात आले आहेत. पलूस येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून सांगली-मीरज दरम्यान रोड शोच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करण्याचे प्रयोजन आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर भाजपमधील अंतर्गत मतभेदाला कसे स्वरूप येते यावरच बंडखोरीचे आणि फंदफितुरीचे चित्र रंगणार आहे हे मात्र निश्चित.

Story img Loader