शिवजंयीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येणार आहे. यासंबंधीच्या गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान भाजपा आमदार राम कदम यांनी मात्र यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी अटी कसल्या टाकताय? हिंदूंचा उत्सव आला की लगेच नियम? अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच शिवजयंती धूम धडाक्यात करणारच असं आव्हान दिलं आहे.
राम कदम काय म्हणाले आहेत ?
राम कदम यांनी ट्वीट केलं असून म्हटलं आहे की, “शिवजयंती साजरी करण्यात ठाकरे सरकारच्या कोणत्याही जाचक अटी आम्ही शिवभक्त ऐकणार नाही. अटी कसल्या टाकताय? हिंदूंचा उत्सव आला की लगेचच नियम? वा रे वा ! करायचे ते करा. शिवजयंती उत्सव आम्ही धूम धडाक्यात करणारच”.
येत्या शनिवारी (दि. १९) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे आणि तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शिव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती वाहून आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योत दौडीत २०० जणांना सहभागी होता येईल. तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्यात ५०० जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.