सोलापूर : सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल व्हायला सुरूवात होण्यापूर्वीच काँग्रेस आणि भाजपचा जोरात प्रचार सुरू आहे. मात्र प्रचारासाठी ग्रामीण भागात गेलेल्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठोपाठ भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांनाही मराठा आरक्षण आंदोलकांचा रोष पत्करावा लागत आहे. मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे सातपुते यांच्या प्रचाराचा ताफा रोखण्यात आला. प्रचारसभा न घेताच सातपुते यांना गाव सोडावे लागले.
दरम्यान, भाजपची प्रचारसभा वडवळऐवजी कोळेगावात घ्यावी लागली. वडवळ हे श्री नागनाथ देवस्थानासाठी प्रसिद्ध मानले जाते. या गावात भाजपचे उमेदवार सातपुते यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याचे ठरले होते. परंतु प्रचार सभा सुरू होण्यापूर्वीच आक्रमक पवित्रा घेत मराठा आरक्षण आंदोलकांनी रस्ता रोखून धरला. भाजपचे स्थानिक नेते विजय डोंगरे व अन्य मंडळींचे सुरूवातीला गावात आगमन झाले. परंतु त्यांच्या प्रचाराचा ताफा अडविण्यात आला. मराठा आरक्षण आंदोलकांनी ‘चले जाव’च्या घोषणा देत रोष प्रकट केला. त्यांचा रोष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उमेदवार, आमदार राम सातपुते या दोघांवर होता.
हेही वाचा – सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
सोलापुरात तीन वर्षांपूर्वी करोना काळात कायदा मोडून एका करोनाबाधित मृत तरुणाची शेकडो जनसमुदायाच्या सहभागातून अंत्ययात्रा काढली असता त्याविरोधात मोची समाजाच्या समुदायावर दाखल झालेला दखलपात्र गुन्हा मागे घेण्यासाठी आमदार सातपुते हे मोची समाजाच्या शिष्टमंडळासमोर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधतात आणि फडणवीस यांनीही, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना लगेचच मोची समाजाच्या समुदायाविरोधातील गुन्हा मागे घेण्याची ग्वाही देतात. यातून मोची समाजाच्या मतदारांवर प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास फडणवीस यांचा स्पष्ट नकार असतो. याच मुद्यावर वडवळ गावात मराठा आरक्षण आंदोलकांचा रोष पाहायला मिळाला. आमदार राम सातपुते हे पोहोचण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय डोंगरे व अन्य पदाधिकारी गावात आले असता त्यांना रोखण्यात आले. राम सातपुते यांनी मराठा समाजाच्या भावनांचा अनादर केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आंदोलकांचा संताप, काहीही ऐकून न घेण्याची मनःस्थिती पाहून शेवटी भाजपचा प्रचाराचा ताफा परत फिरला.
हेही वाचा – कल्याण लोकसभेत ‘ईडी’ची पीडा टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या पुरुष उमेदवारांची माघार?
यापूर्वी काँग्रेसच्या उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांना पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावासह मंगळवेढ्याजवळ मराठा आरक्षण आंदोलकांनी अडवून परत पाठविले होते.