अमरावती पदवीधर मतदारसंघात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मोठय़ा मताधिक्याने निवडणूक जिंकल्याने सरकारची प्रतिष्ठा राखली गेली. पदवीधर मतदारांच्या नोंदणीपासून ते मतदानासाठी बाहेर काढण्यापर्यंत पक्षसंघटनेचा सुनियोजित वापर आणि त्या तुलनेत दुबळा ठरलेला विरोधी पक्ष या डॉ. पाटील यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरल्या.

सलग तीस वष्रे ‘नुटा’ आणि पर्यायाने बी. टी. देशमुख यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या या मतदारसंघात भाजपने गेल्या निवडणुकीत पहिल्यांदा हादरा दिला. या मतदारसंघात राजकीय पक्षप्रवेशाची ती नांदी ठरली. या निवडणुकीत तर विविध व्यावसायिक संघटनांचा प्रभाव क्षीण झाल्याचे चित्र दिसून आले. गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेसचे संजय खोडके यांनी एकाकी लढत दिली. ते काँग्रेसचे उमेदवार होते की त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता, इतपत अवस्था प्रचाराच्या काळात दिसून आली. सरकारातील मंत्री आणि तेही मुख्यमंत्र्यांचे सर्व खाती सांभाळणारे राज्यमंत्री खुद्द िरगणात असल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. एकीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी हजर असतात. तीन वेळा अमरावतीत सभा घेतात, पदवीधरांच्या नोंदणीच्या वेळी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देतात आणि दुसरीकडे काँग्रेसचा एकही मोठा नेता प्रचारासाठी फिरकत नाही, यातूनच काँग्रेसमधील निवडणुकीविषयीची अनास्था दिसून आली.

[jwplayer zZz7idXw-1o30kmL6]

ranjit-patil-chart

काँग्रेसने आजवर या मतदारसंघात ‘नुटा’ला समर्थन दिले होते. या वेळी ‘नुटा’चा उमेदवार नव्हता, पण या संघटनेने कुणालाही पाठिंबा देण्याचे टाळले. सदस्यांना स्वविवेकाने मतदान करण्यास सांगण्यात आले होते. काँग्रेससाठी अडचणींची सुरुवात येथून सुरू झाली. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षण संघर्ष समिती, आयटीआय निदेशक संघटनांसोबत असूनही त्याचा लाभ संजय खोडके यांना मिळू शकला नाही. मराशिप, शिक्षक आघाडीच्या साथीने भाजपने ही निवडणूक जिंकली, पण या निवडणुकीवर व्यावसायिक संघटनांऐवजी पक्षसंघटनेचाच वरचष्मा दिसून आला.

मतनोंदणीने यश

औरंगाबाद येथे शिक्षकांवर झालेला लाठीमार, विद्यापीठातील प्रलंबित प्रश्न अशा मुद्दय़ांवर विरोधकांनी डॉ. रणजित पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न केला, पण हे विषय मतदारांना आकर्षित करू शकले नाहीत. या निवडणुकीत मतदारांची नोंदणी करणे हे एक दिव्य बनले होते. कारण न्यायालयाच्या आदेशाने फेरनोंदणी करावी लागली होती. यासाठी ३५ दिवसांच्या मुदतीत ती करण्याकरिता पक्षसंघटनेचे मोठे पाठबळ आवश्यक असते. भाजप आणि काँग्रेसने यासाठी जोर लावला. पण, यात भाजप वरचढ ठरला. मतदारांची नोंदणी मतदानात रूपांतरीत करण्यात भाजपला यश मिळाले. त्याच वेळी विविध शैक्षणिक संस्थांनी, सरकारी कर्मचारी संघटनांनी दिलेला प्रतिसाद हा त्यांच्यासाठी लाभदायक ठरला. यातूनच डॉ. पाटील यांनी ४३ हजार मताधिक्याने ही निवडणूक जिंकणे शक्य झाले.

काँग्रेसवर आता आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. ही निवडणूक वैयक्तिक करिश्म्याची नव्हती. ज्या पद्धतीने भाजपने प्रचारयंत्रणा राबवली, त्यातून काँग्रेसला बरेच काही शिकावे लागणार आहे. काँग्रेससाठी ही या मतदारसंघातील पहिलीच निवडणूक होती, त्यात हा पक्ष नापास झाला. डॉ. रणजित पाटील यांची कार्यशैली मतदारांना भावली. अत्यंत संयमी वृत्तीने त्यांनी विरोधकांच्या टीकेला तोंड दिले. पक्षांतर्गत मतभेदांवरही त्यांनी मात केली. आता त्यांच्यासमोर हे वर्चस्व टिकवून ठेवण्याचे आव्हान असणार आहे.

लोकसभा निवडणुकीपासून विदर्भात भाजपला यश मिळत गेले.

[jwplayer K8f2NOFD-1o30kmL6]

Story img Loader