पंकजा मुंडे-पालवे यांच्या संघर्ष यात्रेचा समारोप पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे आज झाला, मात्र यातून व येथूनच आता भारतीय जनता पक्षाची सत्तापरिवर्तन यात्रा सुरू झाली आहे, असे प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी चौंडी येथे केले.
राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान सिंदखेडराजा येथून सुरू झालेल्या पंकजा यांच्या ‘पुन्हा संघर्ष यात्रे’चा समोराप शहा यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी ते बोलत होते. शहा म्हणाले, पंकजा यांची संघर्ष यात्रा संपून येथूनच भाजपची सत्तापरिवर्तन यात्रा सुरू झाली आहे. देश काँग्रेसमुक्त करावयाचा असून त्याची सुरुवात महाराष्ट्रापासून करत आहोत. मागच्या पंधरा वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्याचे वाटोळे केले. या काळात महाराष्ट्राची झालेली पिछेहाट भरून काढण्यासाठी नरेंद्र मोदींची मदत मिळणार आहे. त्यासाठीच राज्यात भाजपचे सरकार आणणे गरजेचे आहे. ते लक्षात घेऊनच जनतेने भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन शहा यांनी केले.
पंकजा म्हणाल्या, शौर्य, धैर्य व औदार्य यांचे प्रतीक असलेल्या जिजामाता, सावित्रीबाई फुले व अहल्यादेवी होळकर या तीन महान आदर्शासमोर नतमस्तक होऊन राज्यात सत्तांतराची नांदी केली आहे. महिला व गोरगरीब जनतेवर अत्याचार करणारे सरकार उलथवून टाकण्याचे स्वप्न माझ्या बाबांनी पाहिले होते. ते पूर्ण करण्यासाठी मी बाहेर पडले आहे. मी रडण्यापेक्षा लढण्यावर विश्वास ठेवते, कारण माझ्या अंगामध्ये गोपीनाथ मुंडेंचे रक्त आहे. राज्यातील आघाडीचे सरकार गाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बाबांची शेवटची सभा याच ठिकाणी झाली होती व येथेच त्यांनी सत्तापरिवर्तनाचा नारा दिला होता, अशी आठवणही पंकजा यांनी या वेळी करून देत त्या अनुषंगानेच भावनिक आवाहन केले.
फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा उल्लेख बोलका पोपट असा केला. ते म्हणाले, बलात्कार करणारे राज्यातील ८० टक्के लोक निदरेष सुटतात, याचे वैषम्य पाटील यांना वाटत नाही. भ्रष्टाचार करून हे सरकार व मंत्री दमले नाहीत. मुंबई-पुणे रस्त्याचे टोलवसुलीची निविदादेखील पैसे घेऊन मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व भ्रष्टाचाराच्या मंजुरी आम्ही रद्द करणार हे सांगताना सरकार आल्यावर अजित पवार यांना तुरुंगात पाठवू असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
तावडे यांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, अजित पवार म्हणतात सत्ता द्या, १०० दिवसांत टोल माफ करतो, मग मागचे ५ हजार ७७५ दिवस ते काय करत होते. आता त्यांना पुन्हा सत्ता हवी आहे, मात्र ‘अजित पवार आता आली रे, आली तुझी बारी आली..’ अशी खिल्ली तावडे यांनी उडवली. जानकर, खासदार गांधी यांचेही या वेळी भाषण झाले. प्रास्ताविक कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमदार राम शिंदे यांनी केले.
‘नो कॉमेंट्स’
सभा सुरू झाल्यापासून उपस्थितांमधून पंकजा यांना मुख्यमंत्री करा अशा घोषणा सुरू होत्या. अमित शहा यांचे भाषण सुरू असतानाही त्या सुरूच होत्या, त्यामुळे सभेत काही वेळ गोंधळ उडाला, मात्र शहा यांनी त्यावर कोणतेच भाष्य केले नाही.
मुरकुटे यांची हजेरी
राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी या सभेला हजेरी लावली, मात्र त्यांचा पक्षप्रवेश आज झाला नाही. हेलिपॅडवर त्यांची भाजपच्या नेत्यांशी भेट झाली. त्यांना उद्या (शुक्रवार) मुंबईत बोलावल्याचे समजते.
चौंडीतूनच भाजपची सत्तापरिवर्तन यात्रा- अमित शहा
पंकजा यांची संघर्ष यात्रा संपून येथूनच भाजपची सत्तापरिवर्तन यात्रा सुरू झाली आहे. मागच्या पंधरा वर्षांत काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्याचे वाटोळे केले. त्यासाठीच राज्यात भाजपचे सरकार आणणे गरजेचे आहे. ते लक्षात घेऊनच जनतेने भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन शहा यांनी केले.
First published on: 19-09-2014 at 04:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp regime change yatra from chaundi amit shah