Rajya Sabha Election 2024 BJP Candidate List : भाजपाने राज्यसभा उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देऊ केली आहे. तर ज्यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती, त्या पकंजा मुंडेंना मात्र यावेळी वगळण्यात आले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच (१३ फेब्रुवारी) भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचबरोबर कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना २०१९ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्या काहीशा नाराज होत्या. त्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडेही आपली तक्रार नोंदविली होती. आज राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी देऊन भाजपाने एकप्रकारे त्यांचे पुर्नवसन केल्याचे दिसत आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना गुजरातमधून राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आहे. गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक आणि डॉ. जशवंतभाई परमार यांनाही गुजरातमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
पंकजा मुंडे राज्यसभेत जाणार का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
देशभर लोकसभा निवडणुकांचा माहौल असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार, २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत १५ फेब्रुवारी पर्यंत आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आज गुजरात आणि महाराष्ट्रासाठी सात उमेदवारांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आणि प्रकाश जावडेकर हे तीन जण निवृत्त होत आहेत.
कोण आहेत डॉ. अजित गोपछडे?
डॉ. अजित गोपछडे हे भाजपाच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्षही आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा संघटनेत काम करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले गोपछडे यांनी विद्यार्थी देशत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात केली. एकेकाळी त्यांनी कारसेवा केली होती. भाजपाशी निष्ठावान असलेला नेता म्हणून गोपछडे यांची ओळख आहे. त्यामुळे संघटनेतील एका निष्ठावान पदाधिकाऱ्याला उमेदवारी दिली, असे सांगितले जात आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीचे गणित कसे असेल?
राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे भाजपाचे तीन, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचा प्रत्येकी एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार निवृत्त होत असले तरी पक्षातील फुटीमुळे या दोन्ही पक्षांना जागा मिळणार नाही.
यंदा राज्यसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता असेल. भाजपाचे गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने विधानसभेतील एक जागा रिक्त आहे. भाजपाचे १०४ आमदार असले तरी १३ अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने भाजपाला तीन जागा सहजपणे मिळू शकतात. काँग्रेसचे ४५ आमदार असल्याने या पक्षाचा एक उमेदवार निवडून येण्यात काहीच अडचण येणार नाही. शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना ४० पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा असून, अपक्ष व छोट्या पक्षांचे १० जण बरोबर आहेत. या संख्याबळाच्या आधारे शिंदे गटाचा एक उमेदवार निवडून येईल.
राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जातो. या संख्याबळाच्या आधारे अजित पवार गटाला एक जागा सहजपणे मिळू शकते. उद्धव ठाकरे गटाकडे १५ तर शरद पवार गटाकडे १० आमदार आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येऊन संयुक्त उमेदवार उभा केला तरी ४१ हा जादुई आकडा गाठणे सद्यस्थितीत कठीण दिसते. यामुळे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाला राज्यसभेतील आपापल्या जागा गमवाव्या लागणार आहेत.