राज्यातील मागील तीन-चार दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेंदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून जोरदार गदारोळ पाहायला मिळत आहे. याशिवाय महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनी या मुद्य्यावरून भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीकाही सुरू केली आहे. त्यामुळे राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा – ‘हा यू टर्न आता चालणार नाही’; सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना उद्देशून विधान!
भाजपाने ट्वीटद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांवर टीका केली आहे आणि याद्वारे राष्ट्रवादीकडून होणाऱ्या टीकेला एकप्रकारे प्रत्युत्तर दिलं आहे. “राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करते, असा भासवण्याचा प्रयत्न करत आहे. खर तर राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच विरोध करत आली आहे.” असं भाजपाने म्हटलं आहे.
याशिवाय, “मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या योजनांची नावे बदलण्यात आले. हा महाराष्ट्र शाहू – फुले – आंबेडकरांचा आहेच यात कोणतंही दुमत नाही. पण, तीन महापुरुषांचे नावं घेताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख टाळला जातो. कारण, जितेंद्र आव्हाडांसारखे अफजल प्रेमी नाराज होतील या भीतीने. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कायम स्टेजच्या खाली लावली जाते. कारण, शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जाणता राजा म्हणून हाक मारतात.” अशी उदाहरणंही भाजपाकडून देण्यात आली आहेत.
याचबरोबर “राज्यात आणि केंद्रात शरद पवारांनी अनेक मंत्रीपदे उपभोगली, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गड किल्ल्यांची दुरावस्था त्यांना थांबवता आली नाही. मात्र, शरद पवारांच्या काळात औरंगजेब, अफजलच्या कबरी मात्र सुरक्षित जतन करून ठेवल्या.” अशी टीका भाजपाने केली.
राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्न –
“मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात गड किल्ले संवर्धनासाठी “रायगड प्राधिकरण” स्थापन करण्यात आलं होतं. पण, मविआ सरकार सत्तेत आल्यानंतर प्राधिकरणाचे महत्व कमी करून निधी थांबवण्यात आला. आज हे महाराजांच्या नावाचा वापर करून राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्न करत आहेत.” असा आरोपही भाजपाकडून करण्यात आला आहे.