राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. शिवाय, विरोधात असताना फडणवीसांनी या पॅटनर्नचे कौतुक करत वीजबील वसूलीला विरोध केला होता, याचीही आठवण करून दिली आहे.
याशिवाय फडणवीसांचे दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यातील एक विरोधात असताना फडणवीसांनी यासंदर्भात काय म्हटलं होतं ते दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओत उपमुख्यमंत्री फडणवीसांची आता काय भूमिका आहे, हे दिसून येत आहे. यावरून सुप्रिया सुळेंनी ‘हा यू टर्न आता चालणार नाही’, असं फडणवीसांना उद्देशून म्हटलं आहे.
यावर भाजपाने ‘सुप्रिया सुळे, नुकसान झालेल्या शेतकर्यांचे पंचनामेच करायचे नाही, केले तर सात-आठ महिने जीआर काढायचे नाही, जीआर काढले तर मदत वाटायचीच नाही, अशा थाटात चाललेल्या आपल्या सरकारची आठवण इतक्या लवकर विस्मृतीत गेली?’ असा ट्वीटवद्वारे सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला आहे.
याशिवाय ,‘४ महिन्यांचे सरकार ७ हजार कोटींहून अधिकची मदत शेतकर्यांना देतेच कशी, यावरुन ‘मला तळमळतंय्, मला जळजळतंय्’, अशी तुमची अवस्था होणे साहजिक आहे. शेतकर्यांचे विजेचे प्रश्न असो की सिंचनाचे हे सरकार निश्चितच सोडवेल. काळजी नसावी. तुमच्या अवस्थेवर औषध असलेली तेवढी जाहिरात फक्त पाहून घ्या!’ असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.
सुप्रिया सुळेंनी काय म्हटल आहे? –
‘विरोधात असताना तत्कालिन विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश पॅटर्नचे कौतुक करीत वीजबील वसूलीला विरोध केला होता. आता ते सत्तेत आहेत, त्यांच्याकडे अर्थखाते देखील आहे. त्यांनी आता मध्यप्रदेश पॅटर्ननुसार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.’ असं सुप्रिया सुळेंनी ट्वीट केलं आहे.