केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
भविष्यात विरोधक एकत्र येऊ शकतात, हे लक्षात घेऊन पक्षाचा जनाधार सहा ते दहा टक्क्यांनी वाढवणे, संकुचितपणाचा त्याग करीत व्यापक विचारधारा जोपासणे व वाचाळवीरांचा बंदोबस्त करणे, हेच पक्षासमोरचे सध्या मोठे आव्हान आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले.
बिहारमधील पराभव हा पक्षासाठी निश्चितच चिंतेचा विषय आहे. त्यावर पक्ष पातळीवर लवकरच विचारमंथन होईल. सर्व विरोधक एकत्र आले, तर भाजपचा पराभव होऊ शकतो, हे बिहारने दाखवून दिले आहे. भविष्यात अशीच पुनरावृत्ती घडू शकते. अशा स्थितीत पक्षाचा जनाधार ६ ते १० टक्क्यांनी वाढवणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी संकुचितपणाचा त्याग करत व्यापक विचारधारेचा अवलंब पक्षाला करावा लागणार आहे. सोबतच अपयश पदरी पडले की, थेट माध्यमांसमोर जाणाऱ्या, तसेच इतर अनेक वेळी अनावश्यक विधाने करणाऱ्या वाचाळवीरांचा बंदोबस्त सुद्धा पक्षाला करावा लागणार आहे, असे गडकरी म्हणाले.
भाजप हा ‘कॅडरबेस्ड’ पक्ष आहे. सामूहिक जबाबदारी हेच पक्षाचे तत्त्व आहे. त्यामुळे पराभवाचा दोष कुणा एकाला देता येणार नाही. या संदर्भात ज्यांना मते मांडायची आहेत ते पक्षाच्या व्यासपीठावर का मांडत नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करायला नको होती का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी मोदी तरुण आहेत, उत्साही आहेत म्हणून त्यांनी प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली, असे उत्तर दिले. पक्षातील ज्येष्ठांच्या सूचना स्वीकारार्ह आहेत. ही केवळ माझी नाही तर पक्षाची भूमिका आहे. ती आधीही अनेकदा मांडली गेली. आता पराभवानंतर माध्यमांचे लक्ष त्याकडे गेले. त्याला आम्ही काय करणार, असेही ते म्हणाले. आमचा पक्ष व परिवार मोठा आहे. त्यात सहभागी असलेल्यांची अनेक प्रश्नांवर वेगवेगळी मते आहेत. माध्यमांमधील एक गट अशी भिन्न मते व्यक्त करणाऱ्यांना जाणीवपूर्वक प्रसिद्धी देतो आणि पक्षात वाद आहेत, असे भासवण्याचा प्रयत्न करतो. हा प्रकार आता पक्षाच्या लक्षात आला आहे. त्यामुळे अशी छेद देणारी विधाने करणाऱ्यांना वेळीच सजग करण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
अडवाणी, जोशी आदरणीय
पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरलीमनोहर जोशी हे आमचे आदरणीय नेते असून मार्गदर्शक आहेत. त्यांच्यावर कारवाई करा, असे मी कधीही म्हटले नाही. उठसूठ विधाने करणाऱ्या वाचाळवीरांच्या बाबतीत मी बोललो होतो. मात्र, माध्यमांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला, असेही गडकरींनी यावेळी स्पष्ट केले.