मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी त्यावरुन सुरु असलेला वाद आणि वक्तव्यं अद्यापही सुरुच आहेत. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह अद्यापही माफी मागितल्याशिवाय प्रवेश देणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. बृजभूषण सिंह यांच्या विरोधावरुन महाराष्ट्रात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला असताना आता भाजपाचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनीदेखील राज ठाकरेंना विरोध केला आहे. राज ठाकरेंनी अयोध्यावासियांची माफी मागावी असं ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
“विरोध करणारे विरोध करत आहेत, स्वागत करणारे, स्वागत करत आहेत. पण राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबद्दल केलेलं वक्तव्य चुकीचंच होतं. अटकपासून कटकपर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळा भारत एक आहे. कोणी हिंदू, मुस्लिम, श्रीमंत, गरिब असो सगळ्यांना सगळ्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे. त्यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेलं वक्तव्य चुकीचं होतं,” असं साक्षी महाराज म्हणाले.
अयोध्या दौऱ्याविरोधात राज्यातूनच रसद : राज ठाकरे
“अयोध्यावासियांची एवढीच अपेक्षा आहे की चूक केल्याबद्दल राज ठाकरे यांनी माफी मागावी आणि दर्शनाला यावं. विभीषणही देवाला शरण गेला होता, त्यालाही देवाने माफ केलं होतं. उत्तर भारतीय मुंबईत येत असतील तर तुम्ही त्यांचा अपमान कसा काय करु शकता? त्यांनी क्षमा मागितली पाहिजे,” असं साक्षी महाराज म्हणाले आहेत.
ज्ञानवापीवर बोलताना साक्षी महाराज म्हणाले की, “काहीजण ज्ञानवापीच्या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या सरकारचा, न्यायालयाचा काय खरं आणि काय खोटं आहे हे समोर आलं पाहिजे असा प्रयत्न आहे. तुम्ही फार काळ सत्य लपवू शकत नाही. कोर्टाने याची दखल घेतली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर भाष्य करणं शोभत नाही. पूर्ण जगात ज्या ठिकाणी शिवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी नंदीचे तोंड शिवलिंगाकडे असते. त्यामुळे काशीमध्येही नंदीची तपश्चर्या सफल झाल्याचं वाटत आहे”.
“काहीजण उगाच वाद निर्माण करत आहेत. हे हिंदू-मुस्लीम प्रकरण नाही. मुस्लिम धर्मगुरुंनीही सांगितलं आहे की आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करु, हे सगळ्यांच्या हिताचंही आहे,” असंही साक्षी महाराज म्हणाले.
राज ठाकरे अयोध्या दौरा स्थगित करताना काय म्हणाले होते?
“अयोध्या दौरा काही जणांना खुपला. त्यासाठी विरोधाचा सापळा रचून त्याला राज्यातूनच रसद पुरविण्यात आली. त्यामुळे अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित करण्यामागील भूमिका रविवारी स्पष्ट केली होती.
अयोध्येला जाऊन रामजन्मभूमी आणि ज्या ठिकाणी कारसेवक मारले गेले त्या जागेला भेट देणार होतो. मात्र राजकारणात अनेकांना भावना समजत नाही. मी हट्टाने तिकडे जायचे ठरविले असते तर माझ्याबरोबर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अनेक हिंदू बांधव आले असते. तेथे जर काही झाले असते तर कार्यकर्ते भिडले असते. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असते. त्यांना तुरुंगात टाकून त्रास दिला असता. ससेमिरा मागे लावण्यात आला असता. हा सर्व संभाव्य प्रकार लक्षात आल्याने मी दौरा रद्द केला, असे स्पष्टीकरण राज यांनी दिले.