भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंबईसहीत महाराष्ट्रभरातील लाऊडस्पीकरवरील अजान बंद झाले पाहिजेत अशी पक्षाची भूमिका असल्याचं म्हटलं आहे. जुन्या काळामध्ये वेळ कळण्यासाठी अजानचा वापर केला जायचा. पण आज सगळ्यांकडे घड्याळं, मोबाईल आहेत त्यामुळे आता अजानची गरज नाही अशी भूमिका लाड यांनी मांडली आहे. तसेच आम्ही हे अजान बंद करुन राहणारच असं सांगताना केवळ हिंदू सणांना का विरोध केला जातो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

नक्की वाचा >> पुणे : अजित पवार कार्यकर्त्यांसमोर भाषण देत असतानाच शेजारच्या मशिदीतून अजानचा आवाज आला अन्…

“दिवसातून पाच वेळा अजानचा भोंगा वाजतो. त्याला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा विरोध आहे. आम्ही मुंबईतील, महाराष्ट्रातील कार्यकर्ते म्हणून हे सांगू इच्छितो, आम्ही धर्माला विरोध करत नाहीय. पण धर्माच्या माध्यमातून ज्यापद्धतीने धर्म बळकावण्याचा काम करतायत त्याला आमचा विरोध आहे. पूर्वीच्या काळी अजान याच्यासाठी वापरला जायचा की पाच वेळा नमाज पडत असताना वेळ कळावी. लोकांनी झोपेतून उठावं नमाझ पठण करावं यासाठी अजानचा आधार घेतला जायचा,” असं लाड यांनी अजानसंदर्भात बोलताना म्हटलं.

सध्याच्या परिस्थितीबद्दल भाष्य करताना, “त्या काळात लोकांकडे घड्याळं नव्हती. आज घड्याळं आहेत, मोबाईल फोन्स आहेत. भिंतीवर घड्याळं आहेत. सरकारमध्ये देखील घड्याळ आहे. त्यामुळे आज त्या अजानची गरज नाहीय,” असं लाड म्हणाले.

“महाराष्ट्रात दिवाळीला विरोध, गणपतीला विरोध, होळीला विरोध, गुडीपाडव्याच्या मिरवणुकीला विरोध, रामनवमीला विरोध मग अजानला विरोध का नाही? त्यामुळे या मुंबईतील, महाराष्ट्रातील अजान बंद झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि हे आम्ही बंद करुन राहणार,” असं प्रसाद लाड यांनी सांगितलं आहे.

Story img Loader