राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे गुरुवारी (७ डिसेंबर) आणि शुक्रवारी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाले. दोन्ही दिवस मलिक हे विधीमंडळाच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही, असं स्पष्ट केलं. दरम्यान, फडणवीसांच्या पत्राला ढोंग म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“नागपूरमध्ये लबाड लांडगं ढोंग करतंय… बाकी सगळे सोंग करतायत”, अशा शब्दांत खासदार राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. तसेच नवाब मलिक यांच्याप्रमाणेच प्रफुल पटेल यांच्यावरही आरोप आहेत. दाऊदशी संबंधित लोकांशी त्यांनी व्यवहार केला, असा आरोप भाजपानेच पटेल यांच्यावर केला होता. मग प्रफुल पटेल यांच्याबाबतीत एक न्याय आणि नवाब मलिकांवर हल्ला कशासाठी? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी हेच प्रश्न ‘सामना’च्या (ठाकरे गटाचं मुखपत्र) अग्रलेखातून उपस्थित केले आहेत. ठाकरे गटाच्या या प्रश्नांना भारतीय जनता पार्टीने उत्तर दिलं आहे.

महाराष्ट्र भाजपाने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे, उबाठाचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे संपादक पोपटलाल यांनी त्यांच्या अडीच वर्षांतील महाविकास आघाडीचं ऑडिट केलं असतं तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे उबाठा ‘एनपीए’त गेली आहे. तुम्हाला आता नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा अधिकार उरला तरी कुठे?

हे ही वाचा >> “महाराष्ट्रावर तीन घाशीराम कोतवाल राज्य करत आहेत, हे तिघेही..”; संजय राऊत यांची बोचरी टीका

भाजपाने म्हटलं आहे की, नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला, ते तुरुंगात गेले, सध्या वैद्यकीय कारणांमुळे त्यांना जामीन मिळाला आहे. परंतु, प्रफुल्ल पटेल यांचं प्रकरण वेगळं आहे. त्यांच्यावर ना गुन्हा दाखल आहे, ना ते जामिनावर बाहेर आहेत. उद्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तर जी भूमिका नवाब मलिक यांच्याबाबत, तीच प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतही असती. उबाठा गटानं नैतिकतेचं ढोंग अजिबात रचू नये. नवाब मलिक तुरुंगात असूनही शेवटपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत तुम्ही दाखवली नव्हती. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. त्यामुळे ऑडिट करायचंच असेल तर तुमच्या अडीच वर्षाच्या काळातील नैतिकेतेचं करा. तो रिपोर्ट पाहून तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp says we have same stand for nawab malik praful patel after shiv sena sanjay raut criticism asc