श्रीरामपूर : नगर जिल्ह्यातील शिवसेना व भारतीय जनता पक्षात लोकसभेकरिता झालेल्या युतीचे जोरदार स्वागत करण्यात आले. मात्र स्थानिक पातळीवरील युतीसंबंधी अद्यापही निर्णय झालेला नाही. तो झाल्यास नगर महापालिकेतील सत्तेची समीकरणे बदलतील. दोन्ही पक्षांसाठी हा निर्णय कळीचा मुद्दा ठरणार आहे.
शिवसेना व भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची स्वतंत्रपणे तयारी सुरू केली होती. नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या वाटय़ाला शिर्डी लोकसभा मतदारसंघ तर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा मागील जागा वाटपापासून भाजपाकडे आहे. असे असले तरी दोन्ही मतदारसंघातील उमेदवार शिवसेनेने निश्चित केले होते. शिर्डीतून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. तर नगर दक्षिणेतून घनशाम शेलार यांचे नाव शिवसेनेने सुचविलेले होते. भाजपाने मात्र घाई केली नव्हती. केवळ नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. युतीचा निर्णय झाल्यानंतर शिवसेना भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे दोन्ही पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी युतीचे स्वागत केले.
शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी सेना—भाजपा युती कार्यकर्ते व मतदारांना हवी होती. साडेचार वर्षांत कामावरून मतभेद होते. पण आता मनाने एकत्र येण्याचा निर्णय झाला आहे. १९८४ पासून दोन्ही पक्षांची नैसर्गिक युती आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने एकमेकांवर टीका केली. त्यांची युती होऊ शकते. अखिलेश व मायावती यांची युती होऊ शकते. तर मग हिंदूत्वाचा समान मुद्दा असलेली युती नैसर्गिक आहे, असे ते म्हणाले.
खासदार दिलीप गांधी यांनी युतीचे स्वागत केले. युती झाल्याने दोन्ही पक्षात आनंद झाला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आदेश मानणारे आहेत. यापूर्वीही युती होती. युतीमुळे हिंदू मतांचे विभाजन टळेल. स्थानिक पातळीवरील युतीसंदर्भात निर्णय राज्यस्तरावरील नेते घेतील.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड म्हणाले, हिंदुत्व व राष्ट्रीयत्व हा युतीचा आधार आहे. ती नैसर्गिक आहे. वरिष्ठांनी ती केली. कार्यकर्त्यांत उत्साह आहे. स्थानिक पातळीवर युतीसंबंधी निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी होईल.
शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांनी शिवसेना व भाजपाचे कार्यकर्ते हे पूर्वीपासून एकत्र आहेत. ज्यांना हिंदुत्व मान्य आहे ते मूळ कार्यकर्त्यांची युतीची मानसिकता आहे. स्थानिक पातळीवरही युती करावी लागेल. यापुढे अभद्र युती चालणार नाही. याचा निर्णय सेनेचे वरिष्ठ घेतील, असे त्यांनी सांगितले.
नगरच्या महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजप युती तुटली. भाजपापेक्षा शिवसेनेला जादा जागा मिळाल्या. पण भाजपाने शिवसेनेला बाजूला ठेवून राष्ट्रवादीच्या मदतीने सत्ता स्थापन केली. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी याबद्दल भाजपावर टीका केली होती. जागा वाटप होताना स्थानिक पातळीवरच्या युतीचा निर्णय जाहीर करण्यात आला नाही. पण आता तो निवडणुकीच्या तोंडावर कळीचा मुद्दा ठरणार आहे. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी महापालिकेतील अभद्र युती तोडावी लागेल, असे स्पष्ट केले आहे. आठ दिवसात यासंबंधी चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. तर खासदार गांधी यांनी स्थानिक पातळीवरील युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतली. तो सर्वाना मान्य असेल, असे सांगितले. एकूणच नगर महापालिकेतील राजकारण त्यामुळे आता पुन्हा ढवळून निघाले आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नितीन दिनकर, नितीन उदमले हे इच्छुक होते. तिघांनीही जोरदार तयारी केली होती. पण आता त्याना शांत बसावे लागणार आहे. नगर दक्षिणेतून घनशाम शेलार यांनाही आता उमेदवारी करता येणार नाही.