कंत्राटी नोकर भरतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये शाब्दिक युद्ध पेटलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपानंतर भाजपाने पुन्हा एकदा ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट लिहून शरद पवारांना लक्ष्य केलं आहे. शरद पवार यांनीच महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया रचला. शरद पवारांनी काका-पुतण्यांमध्ये संघर्ष उभा केला. शरद पवार हे अजूनही साडेतीन जिल्ह्यांचे नेते आहेत, अशी बोचरी टीका भाजपाकडून केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना भाजपाने म्हटलं, “महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाचा पाया कुणी रचला असेल तर तो शरद पवारांनी रचला आहे. त्यांनी अनेकांची घरं फोडली. काका-पुतण्यांमध्ये पवारांनी उभा केलेला संघर्ष महाराष्ट्रातील जनता विसरली नाही.
शरद पवार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेच मुळी फोडाफोडीचं राजकारण करून. त्यामुळे फोडाफोडीबद्दल तुम्ही न बोललेलं बरं.”
हेही वाचा- “…तेव्हा आम्ही गप्प बसलो”, शरद पवारांच्या ‘त्या’ निर्णयाबाबत अजित पवारांचं मोठं विधान
“स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेऊन तुम्ही कायम त्यांच्याविचारांविरोधात भूमिका घेतल्या. ज्या काँग्रेसच्या हाताला धरून तुम्ही राजकारणात आला, त्याच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली, हा इतिहास आहे. विदेशी वंशाच्या मुद्द्यांवर सोनिया गांधी यांना विरोध करून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आणि पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी दिल्लीत जाऊन सोनिया गांधींच्या समोर गुडघे टेकून मुजरा केला. त्यामुळे स्वाभिमानाची भाषा तुम्हाला शोभत नाही,” असा टोला भाजपाने लगावला.
हेही वाचा- शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “दडपशाहीमध्ये…”
भाजपाने पोस्टमध्ये पुढे म्हटलं, “धार्मिक राजकारणाचा आरोप करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर तुम्ही मतं मिळवण्यासाठी १३ वा बॉम्बस्फोट मुस्लीम वस्तीत झाल्याचा कांगावा केला होता. भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि राजकारण मात्र घराणेशाही आणि स्वार्थासाठी करायचं ही खरी ‘ढोंगी‘ वृत्ती आहे. लोकांना हे ठाऊक असल्याने पवार, तुमचे नेतृत्व महाराष्ट्राने कधी स्वीकारले नाही. तुम्ही अजूनही साडे तीन जिल्ह्यांचेच नेते आहात.”