निर्धार यात्रेचा परळीत पवार यांच्या उपस्थितीत समारोप

बीड : भाजप-शिवसेनेच्या युतीचा पंचवीस वर्षांचा इतिहास पाहिला, तर अपवाद म्हणून केवळ दोन वेळा त्यांना सत्ता स्थापन करता आली. दोघांची युती होते त्या त्या वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने त्यांना हरवले आहे. त्यामुळे या वेळीही त्यांचा पराभव अटळ आहे, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सोडले. परळी येथे २३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत निर्धार परिवर्तन यात्रेचा समारोप होणार असून काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.

बीड येथे मंगळवारी धनंजय मुंडे यांनी पत्रकार बठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेच्या समारोप कार्यक्रमाविषयी माहिती दिली. या वेळी ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, उषा दराडे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, रवींद्र क्षीरसागर, अक्षय मुंदडा आदींची उपस्थिती होती. धनंजय मुंडे म्हणाले, १० जानेवारीपासून रायगड येथून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा काढण्यात आली.

राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांत ८८ सभा झाल्या असून यात्रेचा समारोप २३  फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या मदानावर होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खारगे आणि गुलाम नबी आझाद हे देखील येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देशातील सव्वाशे कोटी जनतेला खोटे स्वप्न दाखवले. अच्छे दिनच्या नावाखाली महागाई, बेरोजगारी, फसवी कर्जमाफी लादली. सबका साथ सबका विकास म्हणत भाजपने स्वतचाच विकास केल्याचा आरोप मुंडे यांनी केला. भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर निवडणूक लढवली तेच आता चार वर्ष सात महिन्यांत भ्रष्टाचाराने बरबटल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या मनातील राग, असंतोष एकवटून तो मतदानात रूपांतरित व्हावा यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राजू शेट्टींसोबत बोलणी

खासदार राजू शेट्टी यांच्यासोबतची बोलणी अंतिम टप्प्यात असून पूर्वी भाजपसोबत असणारे आणि आता त्यांच्या विरोधात असणारे चच्रेअंती आघाडीसोबत येऊ शकतात, असेही ते म्हणाले.

Story img Loader