सातारा नगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे त्याप्रमाणे सातारमधील राजकारणही चांगलंच तापत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उदयनराजेंनी नुकतीच साताऱ्यातील एक सोसायटी ताब्यात घेतली असून यावेळी विजयी उमेदवारांच्या सत्कार कार्यक्रमात बोलतान त्यांनी शिवेंद्रराजेंवर सडकून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता शिवेंद्रराजेंनी उत्तर दिलं आहे.
उदयनराजे साताऱ्यात रात्री मोठमोठ्याने गाणी लावून गाडीचे स्टंट करतात हे म्हणजे त्यांचे डोंबारी खेळ आहेत असा टोला यावेळी त्यांनी लगावला. ते म्हणाले की, “खासदार उदयनराजे रात्री मोठ्या आवाजात गाणी लावून गाडीवर स्टंट करतात हे त्यांचे डोंबारी खेळ म्हणावेत का? असा खेळ सातारकरांनी त्यांच्या वाढदिवसाला देखील बघितला आहे”.
कारखान्यात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपांवर बोलताना त्यांनी कारखान्यातील सभासदांनी, ऊस घालणाऱ्यांनी त्यावर बोलावं. उदयनराजे सभासद नाहीत आणि शेती तर त्यांनी कधी केलेली नाही असा टोला शिवेंद्रराजेंना लगावला. कोणतीही निवडणूक असली की कारखान्यावर आरोप होतात सांगताना अजिंक्यतारा कारखाना १० व्या दिवसाला पैसै जमा करतो हा भ्रष्टाचार आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. त्यांची बुद्धी भ्रष्ट होतीये का? असा टोलाही त्यांनी लगावला.
“उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे आहेत तर मग लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला? आणि विधानसभेत मी निवडून का आलो? आपण छत्रपतींच्या विचारांचे आहोत आणि मी नाही असं सांगणाऱ्या उदयनराजेंनी याचं उत्तर द्यावं,” असं शिवेंद्रराजे म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “छत्रपतींचा विचार म्हणजे रात्री गाड्या फिरवायच्या, मोठ्याने गाणी लावायची असं आहे का? यात्रेत आपण डोंबाऱ्यांचे खेळ पाहतो, परवा वाढदिवसाला उदयनराजेंचा एक डोंबाऱ्याचा खेळ पाहिला. आपण राज्यसभेचे खासदार आहोत, काय करत आहोत याचं भान ठेवलं पाहिजे”.