वाई:सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी मिळावी अशी साताऱ्यातील महिलांची मागणी असल्याचे भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने साताऱ्यात महिला दिनानिमित्त नारीशक्ती वंदना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर चित्रा वाघ पत्रकारांशी बोलत होत्या. भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले, प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्ष चित्रलेखा माने कदम, भाजप राज्य कार्यकारणी सदस्य गीतांजली कदम, माजी नगराध्यक्ष रंजना रावत, सुवर्णा पाटील, समता मनोज घोरपडे, तेजस्विनी घोरपडे, अर्चना देशमुख, सुनीशा शहा, कविता कचरे, वैशाली भिलारे आदी उपस्थित होत्या.
हेही वाचा >>> सोलापूर : सांगोल्याजवळ टेंभू योजनेचा कालवा फोडून पाणी पळविले; २३ शेतकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल
उदयनराजेंना उमेदवारी मिळावी ही सातारातील सर्व भगिनींची इच्छा असून त्यांच्या भावना आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवणार आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे याबाबत सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. आजच्या मेळाव्यात सर्व महिलांनी उदयनराजेंच्या उमेदवारीची मागणी केली आहे. एक बहीण म्हणून माझीही तीच इच्छा आहे असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा >>> रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना खुले आव्हान; भर सभेत म्हणाले, “हिंमत असेल तर…”
यावेळी मेळाव्यात महिलांनी विविध आघांड्यांवर काम करताना आपल्या जिल्ह्याला, राज्याला आणि देशाला अभिमान वाटेल अशी कीर्ती मिळवावी. लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांगीण विकासाकरता भाजपच्या पाठीशी महिलांनी ठामपणे उभे राहावे असे आवाहनही चित्रा वाघ यांनी केले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही समाजाच्या मूळ आधार असलेल्या महिला भगिनींचा योग्य सन्मान साधण्याचा आटोकाट प्रयत्न महायुती सरकारने केलेला आहे. महायुती सरकारने महिलांचा सन्मान राखल्याचे सांगितले .शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते चित्रा वाघ यांचा मांसाहेब जिजाऊ आणि बाल शिवबा यांची प्रतिमा देऊन सातारकरांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी रंजना रावत, सुवर्णा पाटील, चित्रलेखा माने, अर्चना देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. संतोष कणसे यांनी सूत्रसंचालन, सुरभी भोसले यांनी प्रास्ताविक, अर्चना देशमुख यांनी आभार मानले. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक सुनील काटकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, काका धुमाळ, युवा नेते संग्राम बर्गे, चिन्मय कुलकर्णी, पंकज चव्हाण, मनीषा पांडे, माजी नगराध्यक्ष सुजाता राजे महाडिक, स्मिताताई घोडके, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी, रवींद्र लाहोटी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.