राज्यातील युती तुटणे अवघड आहे, युतीमध्ये देशात भाजप मोठा तर राज्यात शिवसेना मोठा भाऊ हे सूत्र पंचवीस वर्षांपूर्वीच निश्चित झाले आहे, याच आधारावर आम्ही कधी पंतप्रधानपदावर दावा केला नाही, तसे भाजपने मुख्यमंत्री आमचा होणार असा दावा करू नये, असा टोला शिवसेना नेते, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी लगावतानाच मुख्यमंत्री पक्षाचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनीच व्हावे, अशीच शिवसैनिकांची इच्छा असल्याचे स्पष्ट केले.
पक्षाच्या भगव्या सप्ताहाची सुरुवात कदम यांच्या उपस्थितीत शुक्रवारी मेळावा घेऊन करण्यात आली, त्यासाठी ते येथे आले होते. त्यानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी संपर्कप्रमुख सुहास सामंत, पक्षाचे उपनेते आ. अनिल राठोड, शहर प्रमुख संभाजी कदम तसेच नगरसेवक उपस्थित होते.
राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने महाराष्ट्राला लुटून भिकारी बनवले आहे, राज्यातील जनता हे सरकार उलथून टाकण्यासाठी आतुर झाली आहे, आदिवासी व मागासवर्गीय विभागातील खरेदी, आदर्श घोटाळा, दुष्काळी छावण्यातील घोटाळा असे अनेक घोटाळे सरकारने मान्य केले, या घोटाळ्यात राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे, त्यामुळे सरकार कारवाई करत नाही, राज्यातील या भ्रष्टाचाराची आपण खातेनिहाय पुस्तिका तयार करणार असल्याची माहितीही कदम यांनी दिली.
सर्वाधिक दुष्काळ नगर जिल्ह्य़ात आहे, मात्र सर्वाधिक निधी बारामती आणि सांगलीला जातो आहे, हा लुटीचाच प्रकार आहे, असा आरोप करून कदम म्हणाले, की सत्ता आल्यावर आपण उद्धव ठाकरे यांच्याकडे गृहमंत्रिपद मागून एकाही पापी मंत्र्यांना सोडणार नाही, सहा महिन्यांत सर्वांची चौकशी करू, आघाडीने महाराष्ट्रावर ३ लाख कोटी रुपयांचे कर्ज करून, शेतक-यांनाही भिकारी बनवले आहे.
देशात ५२ टक्के व राज्यात १९ टक्के सिंचन असल्याची आकडेवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देतात, याची त्यांना लाज वाटली पाहिजे, महाराष्ट्रातील ९० टक्के सिंचन मंत्र्यांच्या ऊसशेतीसाठी होते, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजप, सेनेची युती हिंदुत्वावर आधारित असल्याने ती तुटणार नाही, भाजप नेते व मंत्री राजनाथसिंह, गडकरी, देवेंद्र फडणवीस या वरिष्ठ नेत्यांपैकी कोणीही तसा विचार मांडत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे फारतर काही जागांची अदलाबदल होऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘मनसेची पुन्हा तीच चाल’
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत हात दाखवून अवलक्षण करून घेतले. सेना संपवण्याचा डाव त्यांच्याच अंगलट आला. काँग्रेस व राष्ट्रवादीकडून सुपारी घेऊन त्यांनी उमेदवार उभे केले होते. महाराष्ट्राने त्यांना त्यांची अाैकात दाखवून दिली, आताही त्यांची तीच चाल आहे, असा आरोप रामदास कदम यांनी केला.
भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा करू नये- रामदास कदम
राज्यातील युती तुटणे अवघड आहे, युतीमध्ये देशात भाजप मोठा तर राज्यात शिवसेना मोठा भाऊ हे सूत्र पंचवीस वर्षांपूर्वीच निश्चित झाले आहे, याच आधारावर आम्ही कधी पंतप्रधानपदावर दावा केला नाही, तसे भाजपने मुख्यमंत्री आमचा होणार असा दावा करू नये, असा टोला शिवसेना नेते, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी लगावला.
First published on: 07-07-2014 at 03:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp should not be claim on prime ministerial ramdas kadam