दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच सलग तिसऱ्यांदा दिल्लीवर आपचेच राज्य असणार आहे हे स्पष्ट झालं आहे. १६ फेब्रुवारी रोजी अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. असं असतानाच आता दिल्लीतील राजकारणावरुन राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारण तापल्याचे चित्र दिसत आहे.

काय म्हणाले होते पवार?

आपने दिल्लीमध्ये भाजपाला पराभूत केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यामध्ये मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना त्यांना भाजपा ही राष्ट्रीय आपत्ती असल्याची टीका केली. “दिल्लीत लागलेल्या निकालाचं आश्चर्य वाटलं नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. मोदी आणि अमित शाह यांच्या अहंकाराला लोक कंटाळले आहेत. भाजपा ही आपत्ती असल्याचे लोकांना पटले असल्याने भाजपाच्या पराभवाची सुरु झालेली मालिका कुठे थांबेल असं वाटत नाही,” असा टोला पवारांनी लगावला होता. मात्र याच टीकेवरुन आता महाराष्ट्र भाजपाने पवारांना सुनावले आहे.

काय आहे ट्विटमध्ये?

पवारांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्याच्या बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर करत भाजपाने पवारांना टोला लगावला आहे. “व्वा, पवार साहेब काय लॉजिक आहे,” असं म्हणत भाजपाने एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये वरील बाजूस पवारांचे “भाजपा देशावरची आपत्ती, पराभवाची मालिका सुरू” हे वक्तव्य दिसत आहे. त्या खाली, ‘३०३ जागा जिंकणारी भाजपा ही राष्ट्रीय आपत्ती!’ आणि ‘५ जागा जिंकणारी राष्ट्रवादी ही राष्ट्रीय संपत्ती!’ अशी दोन वाक्य लिहिण्यात आली आहेत. तर फोटोला कॅप्शन देताना, “वाह पवार साहेब वाह! आता तरी तुम्हाला आपत्ती आणि संपत्ती यातील फरक समजेल, हीच अपेक्षा!,” असा टोला पवारांना लगावला आहे.

दिल्लीत राष्ट्रवादी सपशेल फेल

दिल्ली विधानसभा निवडणुकी आम आदमी पार्टीच्या ‘झाडू’समोर भाजपासह काँग्रेसही साफ झालेली असताना दिल्लीत मतांसाठी चाचपडत असलेली शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या चाचणी परीक्षेत ‘नापास’ झाला. आपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्या फतेह सिंह यांना राष्ट्रवादीने निवडणुकीचे तिकीट दिलं होतं. मात्र गोकलपूर मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला. तर छत्तरपूर मतदारसंघातून मैदानात उतरवलेल्या राष्ट्रवादीच्या राणा सुजीत सिंहला यांचाही पराभव झाला. मुस्तफाबाद मतदारसंघातून मयूर बन, बाबरपूरमधून जाहीद अली तर दिल्ली कॅन्टोंमेंट मतदारसंघातून सुरेंदर सिंह यांचा पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्वच्या सर्व पाच उमेदवारांना दिल्लीमध्ये पूर्णपणे अपयश आल्याचे दिसून आले.

Story img Loader