गोरगरीबांचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्यासाठी भाजपाने सहा बड्या कंत्राटदारांना महाराष्ट्र विकला आहे अशी टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूरमध्ये केली. पंढरपूरमध्ये आज एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी हे वक्तव्य त्यांनी केलं आहे.
सरकार खासगीकरण करतंय याबाबत विचारलं गेलं असता प्रणिती शिंदे म्हणाल्या, “मला कुणीतरी त्यादिवशी एक धक्कादायक गोष्ट सांगितली. मी एका शिक्षकांच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी ते मला म्हणाले कदाचित, शिक्षकांची आमची ही शेवटची पिढी आहे. ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला. सहा कंत्राटदारांना भाजपाने आणि या सरकारने महाराष्ट्र विकला आहे. बिंदुनामावली त्यामुळे रद्द होणार आहे, आरक्षण रद्द होणार आहे. हे सरकारचं एक षडयंत्र आहे. या विरोधात आम्ही सगळेच एक मोठा आवाज उठवला आहे. आरक्षण रद्द करत आहेत, त्यांच्या ठराविक लोकांनाच महाराष्ट्र विकला जातो आहे हे अतिशय धक्कादायक आहे.” असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?
“आमचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी आढावा बैठका घेण्यास सांगितलं आहे. त्यानुसारच आम्ही आढावा घेत आहोत. आज पंढरपूरची बैठक पार पडली. पंढरपूर, मोहोळमध्ये मी बऱ्याचदा आले आहे. आज प्राथमिक स्वरुपात बैठक घेतली. बूथ यंत्रणा, विविध इतर गोष्टी याबाबत आम्ही आढावा घेतला. मागच्या दहा वर्षात देशात आणि राज्यात लोकांवर अन्याय होतो आहे. ५० खोक्यांचं सरकारही आपल्यावर लादलं गेलं आहे. ते काही जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही. आज जनता निराश आणि हताश झाली आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही आता सरकार आणू. त्याच अनुषंगाने आज बैठक घेतली.” असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.