शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बुलढाणा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चिखली येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यातून शिंदे गटासह भाजपावर निशाणा साधला. भारतीय जनता पार्टी हा आयात पक्ष झाला आहे. हा पक्ष आहे की चोरबाजार? अशी खोचक टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंच्या या भाषणावर भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण म्हणजे त्यांची नेहमीची वैफल्यग्रस्त वटवट होती, अशी टीका त्यांनी केली आहे.
एक व्हिडीओ जारी करत अतुल भातखळकर म्हणाले, “उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण म्हणजे नेहमीचीच वैफल्यग्रस्त वटवट होती. खरं तर, उद्धव ठाकरेंनी आता आपला ‘स्क्रीप्ट रायटर’ (भाषण लिहून देणारा या अर्थाने) बदलायला पाहिजे. कारण त्याच-त्याच मुद्द्यांशिवाय उद्धव ठाकरेंच्या भाषणात दुसरं काही नसतं. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबद्दल बोलले, ते योग्य केलं. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाविषयी काय? ज्या विदर्भाच्या भूमीत येऊन राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला, त्या भूमीत गेल्यानंतर तरी किमान उद्धव ठाकरेंनी सावरकरांचा अपमान करणाऱ्यांवर बोलायला हवं होतं” अशी टीका भातखळकर यांनी केली.
हेही वाचा- “मी राज्यपालांचा आगाऊपणा…” काळ्या टोपीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचं कोश्यारींवर टीकास्र!
“भाजपा हा आयात पक्ष झाला आहे” या उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भातखळकर म्हणाले, “आम्ही उपऱ्यांना घेऊन पक्ष चालवतोय, असं तुम्ही म्हणालात. पण तुमच्या पक्षातले उपनेते आणि नेते कुठले आहेत? आमच्याकडून घेतलेल्या उपऱ्यांवर तुमचा पक्षा सुरू आहे. लोकसभेचे आणि विधानसभेचे उमेदवारही तुम्ही घेतले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आता वैफल्यग्रस्त वटवट बंद करावी आणि आपला उरला-सुरला शिल्लक पक्ष कसा वाचवता येईल, यासाठी प्रयत्न करावा” अशी खोचक टोलेबाजी भातखळकरांनी केली आहे.