“मी पुन्हा येईन” म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ चा निवडणूक प्रचार गाजवला होता. परंतु, निवडणूक निकालानंतर झालेल्या राजकीय नाट्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आणि देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न भंग झालं. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आणि पुन्हा नव्याने स्वतःचं सरकार स्थापन करण्यात देवेंद्र फडणवीसांना यश आल्यानंतरही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदी बसू शकले नाहीत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवर बसवून आता आगामी काळातही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असतील असं सांगण्यात येतंय. मात्र, त्यापार्श्वभूमीवर भाजपा महाराष्ट्राने त्यांच्या अधिकृत X खात्यावर (पूर्वीचे ट्विटर) एक व्हिडीओ पोस्ट केल्याने राज्यात पुन्हा एकदा नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> ‘..मी पुन्हा येईन!’ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? भाजपा महाराष्ट्रने पोस्ट केला ‘तो’ व्हिडीओ

भाजपाने केलेल्या पोस्टमध्ये मी पुन्हा येईनचं घोषवाक्य आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, तासाभराच्या आतच भाजपाने ही पोस्ट डिटिलही केली आहे. तर, यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. “हा व्हिडीओ सोशल मीडिया मर्यादित आहे”, असं केशव उपाध्ये म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “जनादेश यात्रेतील हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकदा टाकला गेला आहे. त्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असते. या आधीच माननीय देवेंद्रजीनीच स्पष्ट केले आहे की,एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि त्यांच्याच नेतृत्वात आगामी निवडणुका लढविल्या जातील. त्यामुळे कुणीही वेगळा अर्थ काढू नये”, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

भाजपाने केलेल्या पोस्टमध्ये काय होतं?

“मी पुन्हा येईन. याच ठिकाणी, याच निर्धाराने, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी!” भाजपा महाराष्ट्राने ही कविता काही वेळापूर्वीच पोस्ट केली आहे. ज्यावरुन विविध चर्चा आता सुरु झाल्या आहेत. पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील का? समजा अपात्रतेचा निर्णय झाला तर पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील का? एक-ना दोन चर्चा सुरु झाल्या आहेत. इतकंच नाही तर महाराष्ट्र भाजपाने ही कविता पोस्ट केल्यानंतर त्यातल्या उत्तरांमध्येही लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स तर शपथविधी सोहळा कधी आहे? असाही प्रश्न विचारत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp spokeperson keshav upadhya clarify behine me punha yein video on bjp x account sgk
Show comments