मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना लसीचे दोन घेणाऱ्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. नागरिकांच्या रोषामुळे महाविकास आघाडी नमलं असं, टीकास्त्र भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं आहे. भाजपाच्या आंदोलनानंतर सरकारला जाग आली, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

“सविनय कायदेभंगाच्या लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले. अभिनंदन मुंबईकर!”, असे ट्वीट भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्याच्या घोषणेनंतर केले आहे.

 

केशव उपाध्ये यांनी आरोग्य सेतूचा वापर न करण्याविषयीही मुख्यमंत्र्यांना फटकारले. “भाजपाच्या आंदोलनानंतर अखेरीस मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना लोकल प्रवासाची बुद्धी झाली. पण दोन डोस झालेल्यांसाठी वेगळी परवानगी काढायची अट कशाला ठेवलीत? एरवी उठसूठ केंद्राकडे बोट दाखवता पण लशीच्या डोसाच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारनेच तयार केलेल्या आरोग्य सेतू ॲपचा वापर का करत नाही?”, असा सवाल उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील, त्यांना १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. अ‍ॅपद्वारे किंवा पालिकेच्या कार्यलयात पास उपलब्ध होणार आहे. हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय उद्या जाहीर होणार आहे. उद्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हॉटेलबाबतचा निर्णय घेतला जाईल असे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Story img Loader