महाराष्ट्रातलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारने म्हटलं आहे. एवढच नाहीतर सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा देखील आसाम सरकारने केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा हे महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्र पळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आता त्यांच्यावर होत आहे. आसाम सरकारच्या या दाव्यावरून आता विरोधी पक्षांकडून आसाम सरकार आणि भाजापवर जोरदार टीका सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून केलेल्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला आहे. सुळे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळवले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!

सुप्रिया सुळेंच्या या टीकेला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्त देताना, “ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? परत विकत घेतले? किती राष्ट्रवादीचे नेते यांत सहभागी आहेत?” असे प्रश्न विचारले आहेत.

याशिवाय, “या सरकारमध्ये एक उद्योग गेला हे दाखवा? थोडी जबाबदारीची अपेक्षा ठेऊ शकतो ना महाराष्ट्र आपल्याकडून? महाविकासआघाडी सरकार असतानाच महाराष्ट्रातील उद्योग गेले.” असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंनी दिला पुरावा –

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढच्या ट्विटमध्ये सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथेच असल्याचा पुरावा देखील दिला आहे. त्यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात सुळे यांनी लिहिलं आहे की, “श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही.”

मुख्यमंत्र्यांना हरकत नोंदवण्याची विनंती –

याचबरोबर, सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, त्यांनी राज्याचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी.

Story img Loader