“शरद पवारांनी राजीनामा देऊन फेटाळला, उद्धव ठाकरेंनी प्रकल्प मंजूर केला आणि…” भाजपा नेत्याची टीका
उद्धव ठाकरे यांनी बारसू या ठिकाणी भेट दिली. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या भावना समजून घेतल्या. तसंच गावकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. त्यामुळे माझाही या प्रकल्पाला विरोध असणार आहे. वेळ प्रसंगी गरज पडली तर महाराष्ट्र पेटवू असं म्हणत आव्हान दिलं आहे. त्यानंतर भाजपाने आता उद्धव ठाकरेंवर टीका केली. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यातलं साम्य सांगत उद्धव ठाकरेंवर टीका केली.
काय म्हटलं आहे केशव उपाध्येंनी?
प्रश्न : उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात साम्य काय?
उत्तर : दोघेही स्वतःला नेहमी कुंपणावर ठेवतात. पवारांनी आधी राजीनामा दिला आणि लगेचच तो फेटाळला. उद्धव ठाकरेंनी आधी प्रकल्प मंजूर केला आणि त्याला विरोध सुरु केला. #तळ्यात_मळ्यात!! असं ट्वीट केशव उपाध्ये यांनी केलं आहे
उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे?
बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असं मला गद्दारांनी सांगितलं होतं. आम्ही जेव्हा नाणारला विरोध केला आणि नाणारमध्ये हा प्रकल्प होणार नाही हे ठरलं तेव्हा या गोष्टी घडल्या होत्या. मात्र आता प्रकल्प आणा किंवा आणू नका या सरकारच्या खुर्चीचे पाय मला डगमगताना दिसत आहेत असं म्हणत बारसू प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे सरकार आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. बारसू या ठिकाणी उद्धव ठाकरे आले होते. तिथल्या कातळ शिल्पांची पाहणीही त्यांनी केली. तसंच पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली.
विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्रात का आणत आहात?
आज बारसूच्या प्रकल्पासाठी माझं पत्र नाचवत आहात मग वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एअरबस यांसारखे प्रकल्प गुजरातला का गेले? ते पण माझ्या कारकिर्दीतच येत होते ते तिकडे का जाऊ दिले? आज तुम्हाला सांगतो ही रिफायनरी गुजरातला न्या आणि तिथला वेदांता फॉक्सकॉन किंवा इतर प्रकल्प ज्यांच्यावरुन वाद नाहीत ते महाराष्ट्रात आणा. गिफ्ट सिटी गुजरातला का गेली? चांगल्या गोष्टी दिल्ली आणि गुजरातला न्यायचे आणि विनाशकारी प्रकल्प लादायचे याला काय म्हणायचं? असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.