कराड : राज्यातील काँग्रेसच्या विधानसभा सदस्यांची संख्या ४५ असून, त्यातील ३० किंवा त्याहून अधिक आमदार फुटून बाहेर पडतील अशी सूतराम शक्यता नसल्याचा दावा करताना मात्र, भाजपच्या गोटातून अफवा पसरवण्याचे काम होत असल्याची टीका काँग्रेसनेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
हेही वाचा >>> “तुमची असेल-नसेल ती सगळी ताकद लावा अन्…”, पंतप्रधान मोदींना शरद पवारांचं जाहीर आव्हान
जे शिवसेनेबाबत घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत घडेल आहे. त्यात नेते सोडून गेले असलेतरी जनता सोडून जाणार नाही, आणि याचा प्रत्यय लवकरच येईल, असा विश्वास त्यांनी दिला. पक्षफुटीचे राजकारण मी अनेकदा पाहिलेले आहे. छोट्या-मोठ्या प्रमाणात लोक येतात अन् जातातही असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.
भाजपमध्ये यापूर्वी विविध पक्षांमधून गेलेल्या लोकांच्या गर्दीमध्ये कोणाला काय पद मिळणार? हा प्रश्न आहे. राज्य सरकारला साधा मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्तीही रखडलेली आहे. हे सारे वाटते तितके सोपे नसल्याचा इशारा चव्हाण यांनी दिला.
हेही वाचा >>> “जितेंद्र आव्हाडांमुळे पक्षाचं नुकसान झालं”, अजित पवारांच्या आरोपाला शरद पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “भाजपाबरोबर…”
आजची राजकीयस्थिती पाहता सर्वसामान्यांचा स्वतःवरच विश्वास राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत असून, या परिस्थितीबद्दल केवळ नेत्यांनाच दोष देऊन चालणार नाही. त्यांना निवडून कोणी दिले? अमिषांना बळी कोण पडले? हेही पहाणे महत्वाचे असल्याचे चव्हाण यांनी सूचित केले. भाजपला हुकूमशाही प्रस्थापित करायची असल्याचे मी सांगत आलो आहे. अमित शहा यांनी अनेकदा काँग्रेसमुक्त भारत म्हणणे म्हणजे त्यांना विरोधी पक्षच नको आहे. छोटे पक्षही नको झाले आहेत. केवळ भाजपचेच सरकार. हुकूमशाही पाहिजे आहे. त्यामुळे देशात हुकूमशाही प्रस्तापित करण्याची ही प्रक्रिया सुरू असून, देशाला त्या दिशेने नेले जात आहे. पण, हे सारे होऊन द्यायचे की नाही ते अखेर देशवासीयांच्याच हातात असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.