अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालपासून जोरदार राजकीय घडामोडी सुरू होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं म्हटलं होतं. त्यांनंतर आज सकाळपासूनच भाजपाच्या गोटात वेगवाग हालचाली सुरु असल्याचे दिसून येत होते. त्यावरून भाजपा आपला उमेदवार मागे घेणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं. अखेर भाजपाने या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे आज जाहीर केले. भाजपाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून तसेच सर्वसामान्यांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत आणि वेगवेगळे अंदाजही लावले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपाला राज ठाकरेंनी लिहलेलं पत्र हा ‘स्क्रिप्ट’चा भाग होता. असं म्हणत भाजपावर टीका केली. यावर आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले की, “अंधेरी पोटनिवडणुकीबाबत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि सर्वच महाराष्ट्राच्या नेत्यांना वाटत होतं की ही निवडणूक होऊ नये. अशावेळी आमच्या शीर्ष नेतृत्वाने विचार केला, खरंतर मी देवेंद्र फडणवीस आणि आमच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो.”
…अशावेळी सर्वांनी मोठं मन केलं पाहिजे –
तर “ उमेदवारी अर्ज भरावाच लागत असतो जवळपास २० हजार लोक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होते. देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांच्या नेतृत्वात ५१ टक्के मतं मिळवण्याची तयारी आम्ही केली होती. मात्र दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी निवडणुकीस उभा आहेत. अशावेळी सर्वांनी मोठं मन केलं पाहिजे आणि आपली आतापर्यंतची महाराष्ट्राची परंपरा जपली पाहिजे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला.” असंही बावनकुळेंनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं.
संजय राऊतांच्या टीकेवर काय म्हणाले? –
याचबरोबर संजय राऊतांनी भाजपावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळेंनी “राज ठाकरे बोलले ते स्क्रिप्ट जर असेल तर मग शरद पवार जे बोलेले तीही स्क्रिप्ट आहे का? आम्ही शरद पवारांना सांगायला गेलो का स्क्रीप्ट करा म्हणून. राज ठाकरे हे सन्मानाने बोलले, राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली. राज ठाकरे नेहमीच आपली भूमिका मांडत असतात.” असं बोलून दाखवलं.
संजय राऊतांनी काय केली आहे टीका? –
या सर्व प्रकरणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबई सत्र न्यायालयात संजय राऊतांना हजर करण्यात आले होते. तेव्हा, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “भाजपाला राज ठाकरेंनी लिहलेलं पत्र हा ‘स्क्रिप्ट’चा भाग होता. शिवसेना अंधेरीची पोटनिवडणूक ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होती. भाजपाने या मतदारसंघात सर्वे केला होता. पराभवाची चाहूल लागल्यामुळेच भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला,” असे राऊत यांनी म्हटलं आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिलं आहे.
शरद पवार काय म्हणाले होते? –
“सगळ्या पक्षांनी केलं आहे म्हणून मी हे आवाहन करत नाही. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून हे आवाहन करत आहे. अर्ज परत घेण्याची मुदत अजून बाकी आहे. त्यापूर्वी यासंबंधी निर्णय घेणं गरजेचं होतं. मीदेखील परिस्थितीचा आढावा घेत होतो. ही निवडणूक बिनविरोध करावी असं मला वाटतं. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसाआधी हे सांगणं गरजेचं होतं”.