लोकसभेच्या रत्नागिरी मतदारसंघावरून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते रामदास कदम चांगलेच आक्रमक झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही रत्नागिरी हा मतदारसंघ सोडणार नाही. या जागेवर आमचा खासदार आहे. या जागेवर आगामी निवडणुकीत आमचाच उमेदवार उभा राहील असे रामदास कदम म्हणाले. तसेच सर्वांना संपवून भाजपालाच जिवंत राहायचंय का? असा प्रश्नही त्यांनी केलाय. रामदास कदम यांच्या याच विधानावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातायत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील या विषयावर बोलताना आम्ही घटकपक्षांना योग्य तो सन्मान देतो. रामदास कदम यांनी केलेले विधान हे वैयक्तिक स्वरुपाचे आहे, असं ते म्हणाले.

“….त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील”

“रामदास कदम जे बोलले आहेत, त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील. रामदास कदम यांनी केलेलं विधान हे काही महायुतीचं मत नाही. त्यांचं मत हे वैयक्तिक स्वरुपाचं आहे,” अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनुकळे यांनी दिली.

“आमच्याकडे घटकपक्षांना खूप मान आहे”

“मी वारंवार सांगतो की भाजपा सहकारी पक्षांना चांगल्या पद्धतीने सांभाळतो. आमच्याकडे घटकपक्षांना खूप मान आहे. काँग्रेस पक्षाने घटकपक्षांना संपवलं. आम्ही मात्र घटकपक्षांना प्रचंड ताकद दिली, मान सन्मान दिला,” असंही बावनुकळे म्हणाले.

रामदास कदम काय म्हणाले होते?

रामदास कदम यांनी रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघावर भाष्य केलं होतं. काहीही झालं तरी आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, असं कदम म्हणाले होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावरही टीका केली होती. “सर्वांना संपवून भाजपालाच जिवंत राहायचं आहे. परंतु, असं होणार नाही. आपण दोघे भाऊ-भाऊ, तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू… असं चालणार नाही. महायुतीत असं होता कामा नये. कुठल्याही परिस्थिती रत्नागिरीची जागा आम्ही सोडणार नाही. ती जागा आम्ही लढवणारच. ती आमच्या हक्काची जागा आहे. तिथे आमचा उमेदवार निवडून आला आहे,” असं रामदास कदम म्हणाले.

“पिक्चर बाकी आहे”

दरम्यान, महायुतीच्या या अंतर्गत मतभेदावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणूक जवळ आल्यानंतर महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढणार आहे. रामदास कदम यांनी केलेले विधान हे ट्रेलर आहे. खरा पिक्चर तर बाकी आहे, असं थोरात म्हणाले.

Story img Loader