शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामानाला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज्यासह देशातील विविध विषयांवर भाष्य केलं. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या या मुलाखतीबाबत बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काळू बाळूचा तमाशा म्हटलं आहे. तसेच एक ट्विट करत काही प्रश्न विचारले असून या प्रश्नांची उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावेत, असं आव्हान बावनकुळे यांनी दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत.”

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी मोदी, देवेंद्र फडणवीसांचा विश्वासघात केला, त्यामुळेच..”, भाजपाच्या बड्या नेत्याची बोचरी टीका

१.दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?
२.१९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?
३.सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?
४.राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?
५.उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?

“उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे. जय महाराष्ट्र!”, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

उद्धव ठाकरे मुलाखतीत काय म्हणाले होते?

“मी मोदी सरकारला मुद्दाम मोदी सरकार म्हणतो. कारण मला आता मोदी सरकार नको आहे, तर भारत सरकार हवं आहे. मोदी सध्या राज्यभरात फिरत आहेत. एखाद्या गल्लीबोळात रोड शो करतील. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश कसा आहे हे मोदींनी अनुभवलं पाहिजे. मोदी सरकारच्या थापाही उघड झाल्या आहेत. मी भाषणांमधले मुद्दे यात मांडणार नाही पण हे सरकार म्हणजे गजनी सरकार झालं आहे”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. तसेच “भ्रष्टाचाऱ्यांना एकत्र घेत पक्ष फोडण्याचं काम आणि गद्दारी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp state president chandrashekhar bawankule criticism of uddhav thackeray interview kgt
Show comments