भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना रुग्णालयामध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार करावेत असा खोचक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रुपाली ठोंबरे-पाटील यांनी दिला आहे. घड्याळ बंद पाडण्यासंदर्भात बावनकुळे यांच्याकडून सातत्याने होत असणाऱ्या टीकेवरुन रुपाली ठोंबरे-पाटील यांनी ही टीका केली आहे. प्रसारमाध्यमांसाठी जारी केलेल्या व्हिडीओमधून त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षांना लक्ष्य केलं आहे.

नक्की वाचा >> ठाकरेंची मतदानाला दांडी! पवार-शेलार गटातून निवडून आल्यानंतर मिलिंद नार्वेकर स्पष्टच बोलले, “ते नाही आले तरी हरकत नाही, उमेदवारी…”

मागील काही दिवसांपासून बावनकुळे हे सातत्याने महाविकास आघाडीमधील पक्षांना आपल्या भाषणांमधून लक्ष्य करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या निवडणूक निशाणांवरुन बावनकुळे यांंनी मागील काही दिवसांमध्ये अनेकदा टोला लगावला आहे. “घड्याळ बंद पाडणं आणि मशाल विझवणं हेच आमचं लक्ष्य आहे. घडयाळ बारामतीत बंद पाडलं पाहिजे, काँग्रेसचा पंजा साकुलीत थांबला पाहिजे आणि उद्धव ठाकरेंनी हाती घेतलेली मशाल अरबी समुद्राच्या पाण्याने विझवली पाहिजे” असा हल्लाबोल बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेमध्ये केला होता. याच आशयाची टीका त्यांनी पुन्हा एकदा केल्यानंतर रुपाली ठोंबरे-पाटील यांनी बावनकुळेंवर उपचार करण्याचा सल्ला दिला आहे.

“भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे भाऊ यांना कोणीतरी तातडीने उपचारांसाठी रुग्णालयामध्ये घेऊन जावं. सतत्याने त्यांना झटके येत आहेत. घड्याळ बंद पाडू, महाविकास आघाडीला उमेदवार भेटणार नाही यासारखी विधानं म्हणजे या झटक्याचं लक्षण आहे. त्यांच्यावर त्वरित उपचार करणं गरजेचं आहे,” असं रुपाली ठोंबरे-पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांनी सरकारसमोरील प्रश्नांवर भाष्य केलं पाहिजे अशी अपेक्षाही राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्या असणाऱ्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी व्यक्त केली आहे. “महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, शेतकऱ्यांना लवकर मदत पोहोचली पाहिजे, दिवाळीआधी त्यांना अन्नधान्याची कीट मिळाली पाहिजेत.
असे प्रश्न न सोडवता सातत्याने त्यांना जे झटके येत आहेत त्यासाठी त्यांच्यावर उपचार होणं गरजेचं आहे,” असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

नक्की वाचा >> “शरद पवार २०२४ च्या निवडणुकीमध्ये मोदींना साथ देतील असा विश्वास वाटतो”; मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचं विधान

यापूर्वीही रुपाली ठोंबरे-पाटील यांनी बावनकुळेंच्या या विधानावर आक्षेप नोंदवला होता. “राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ बंद पाडणं, हे कुणाच्या बापाची जहागिरी नाही. तुम्हाला या जन्मात नव्हे तर पुढच्या सात जन्मातही घड्याळ बंद पाडणं शक्य नाही,” असं रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या होत्या. तसेच, हिटलरशाही आणि दबाब यंत्रणांचा आधार न घेता मैदानात या, राज्यातील जनता भाजपाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हानही त्यांनी दिलं होतं.

Story img Loader