भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. “संताजी-धनाजी जसे मुघलांना पाण्यात दिसत होते, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना शिंदे-फडणवीस दिसतात. त्यांनी या दोघांचा धसका घेतला आहे”, असे बावनकुळेंनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंना मेळाव्यात अथवा कार्यकर्त्यांशी बोलतानाही शिंदे-फडणवीसच दिसतात, अशी टोलेबाजी त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा वापर शिवसेनेविरोधात “कॉन्ट्रॅक्ट किलर”प्रमाणे होत असल्याचा गंभीर आरोप ‘सामना’ या मुखपत्रातून करण्यात आला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना “त्यांची कॅसेट जुनी झाली आहे. दुसरी वाजवायला त्यांच्याकडे कॅसेट नाही” अशी खोचक प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीवरूनही ताशेरे ओढले आहेत. “उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष फेसबुकवर सरकार चालवलं. ते मंत्रालयात आले नाहीत. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचीही चांगली कामगिरी नव्हती”, अशी टीका त्यांनी केली आहे. निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करण्यासारखं आहे, असेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, “घडयाळ बारामतीत बंद पाडलं पाहिजे, काँग्रेसचा पंजा साकुलीत थांबला पाहिजे आणि उद्धव ठाकरेंनी हाती घेतलेली मशाल अरबी समुद्राच्या पाण्याने विझवली पाहिजे” असा हल्लाबोल बावनकुळे यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आता स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून दूर गेले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. “आतापर्यंत जे काही राजकारण झालं, त्याला पातळी होती. पण गेल्या पाच ते सहा वर्षांत रुपयाप्रमाणे ती पातळीही घसरत चालली आहे”, असं प्रत्युत्तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी यावर दिलं आहे.