Chandrashekhar Bawankule on Congress : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. दिल्लीत भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवलं आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर आम आदमी पक्षाने जागा मिळवल्या आहेत. भाजपाला ४८ आणि आम आदमी पक्षाला २२ जागा मिळवण्यात यश आलं आहे. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. दिल्लीत आता लवकरच भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे. खरं तर इंडिया आघाडीत एकत्र असूनही काँग्रेस आणि आम आदमी पक्ष दिल्लीची निवडणूक स्वतंत्रपणे लढले. मात्र, याचाच फटका दोन्ही पक्षाला बसल्याचा दावा आता इंडिया आघाडीतील नेत्यांकडून केला जात आहे.
काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा दिल्लीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येत आहेत. तसेच दिल्लीत काँग्रेसला एकही जागा न मिळाल्यामुळे काँग्रेसवर सत्ताधारी पक्षाकडून टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही काँग्रेसवर जोरदार टीका केली. “२०४७ पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“काँग्रेस पक्षाकडे कोणतंही मॉडेल नाही. कोणतीही निती नाही. काँग्रेसकडे कोणतीही नितिमत्ता नाही. जनता काँग्रेसला मते का देतील? त्यांच्याकडे कोणतीही योजना नाही. २०४७ पर्यंत काँग्रेस हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. २०४७ पर्यंत या देशात काँग्रेस निवडणूक जिंकू शकत नाही. कारण २०४७ पर्यंत विकासाचा मार्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या संकल्पावर राष्ट्र पुढे चालणार आहे. जनता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या संकल्पांना साथ देईल”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे.
अडीच दशकांनंतर दिल्लीत भाजपाचं पुनरागमन
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४८ जगांवर विजय मिळवत तब्बल अडीच दशकांनंतर दिल्लीच्या सत्तेत पुनरागमन केलं आहे. ही दमदार कामगिरी करताना भाजपाने आम आदमी पक्षाचा धुव्वा उडवला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा देखील पराभव झाला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.