Chandrashekhar Bawankule On Devendra Fadnavis : राज्यात विधानसभेची निवडणूक पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबाबतही खलबतं सुरु आहेत. तसेच सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणीही सुरु असून महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांवर आता राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत सूचक विधान केलं आहे. ‘केंद्रीय नेतृत्व योग्य तो निर्णय घेतील’, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.

हेही वाचा : Amol Mitkari : “आता एकतर ते जिवंत राहतील नाही तर मी”, अमोल मिटकरींचा मनसेच्या नेत्यांना इशारा; अकोला पोलिसांवरही केले आरोप!

चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिला. या जिल्ह्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजूरांसाठी, जिल्ह्यातील रस्त्यांसाठी, जिल्हा परिषदेच्या कामांसाठी तसेच जवळपास ७५ वेगवेगळ्या विभागांसाठी विकास कामे केली जाणार आहेत. कधी काळी २०० कोटी रुपये नागपूरसाठी मिळायचे. मात्र, आता १२०० कोटी रुपये नागपूर जिल्ह्याला मिळाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही आभार मानतो”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

बावनकुळेंचं फडणवीसांबाबत सूचक विधान

“देवेंद्र फडणवीस हे उत्कृष्ट संघटक आहेत. शासन आणि प्रशासनामध्ये काम करण्याचा त्यांचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे संघटनेला मोठा फायदा होईल. मात्र, याबाबत केंद्रीय नेतृत्व योग्य तो निर्णय घेतील. पण माझ्या दृष्टीने केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतल्यास आम्हाला मान्य राहील. मात्र, महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेसाठी त्यांचं येथील सरकारमधील स्थान महत्वाचं आहे. तसंच संघटनेमधीलही स्थानही महत्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला हेच वाटेल की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहावं. कारण ते आमचे नेते आहेत”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

विरोधकांवर टीका

“ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे काय मागणी केली? याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा. ठाकरे गट विधानसभा निवडणूक मशाल चिन्हावर लढो की अजून कोणत्या चिन्हावर लढो. मात्र, काँग्रेसने बेईमानी केली. काँग्रेसने जनतेला खोटं बोलून मते मिळवले आहेत. इंडिया आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींव टीका केली. सांगितलं की संविधान बदलणार आहेत. मात्र, जेवढं खोटं बोलायचं होतं तेवढं काँग्रेसचे नेते खोटं बोलले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काँग्रेसने केलं”, असा हल्लाबोलही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp state president chandrashekhar bawankule on devendra fadnavis bjp national president politics gkt