Chandrashekhar Bawankule On Kirit Somaiya : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विविध मतदारसंघात नेत्यांचे दौरे वाढले आहेत. वेगवेगळ्या मतदारसंघाची जबाबदारी विविध नेत्यांवर देण्यात आलेली आहे. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये जागा वाटपासंदर्भातही चर्चा सुरु आहेत. मात्र, महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा आहेत. अशातच भाजपाचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे पक्षावर नाराज असल्याची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती पक्षाकडून जाहीर करण्यात आली होती. मात्र, किरीट सोमय्या यांनी हे पद नाकारलं आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून भाजपाच्या नेतृत्वाला नकार कळवला आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी एक पत्रकही प्रसिद्ध करत भाजपा निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष व माजी खासदार रावसाहेब दानवे यांना पाठवलं आहे. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या या निर्णयानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “किरीट सोमय्या हे पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“माजी खासदार किरीट सोमय्या हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र, पक्षाचे नेतृत्व हे कोणाला विचारून एखादे पद किंवा जबाबदारी देत नाही, याबाबत तसा नियमही आहे. आता कोणाला आमदारकी द्यायची असेल तर पक्ष विचारत नाही. किंवा एखादी जबाबदारी द्यायची असेल तर विचारून देत नाही. मला प्रदेशाध्यपदाची जबाबदारी देण्यात आली, मलाही पक्षाने विचारलं नाही, तुम्ही काम करा सांगितलं. शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांना पक्षाने जबाबदारी दिली. ते ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील”, असं चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
I thank BJP Maharashtra for appointing Me as Member of Campaign Committee & Expressed REGRET & Inability to do the same
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 10, 2024
I wrote @cbawankule that for last 5 & 1/2 years (since 18/2/2019) I am doing BJP work as ORDINARY Member & Continue the same & will NOT join Campaign Comitee
सोमय्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये काय म्हटलं?
“पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीच्या सदस्यपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी महाराष्ट्र भाजपाचे आभार मानतो. मात्र मी हे पद स्वीकारण्यास असमर्थ आहे, त्याबद्दल खेद व्यक्त करतो. मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितलं आहे की गेल्या साडेपाच वर्षांपासून मी भाजपाचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे. तेच काम यापुढेही चालू ठेवेन. मात्र, मी प्रचार समितीत सहभागी होणार नाही”, असं त्यांनी म्हटलं आहे.
“न विचारताच घोषणा केली, ही पद्धत चुकीची”
दरम्यान, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रावसाहेब दानवे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, हे मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी”.