Chandrashekhar Bawankule : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोर जावं लागलं. निवडणुकीतनंतर पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपही झालं. पण आता गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या काही महिन्यांत होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरु केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. याबाबत आता महायुतीच्या नेत्यांकडून सूचक भाष्य केलं जात आहे.
आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आणि महायुतीच्या फॉर्म्युल्याबाबत मोठं भाष्य केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवायच्या एकत्र की स्वतंत्र? या संदर्भातील निर्णय आमचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी घेतील आणि ते जो निर्णय घेतील तोच निर्णय भाजपा करेल”, असं चंद्रशेखर बावनकुळे स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा : छगन भुजबळ हे अजित पवार गटात राहतील की नाही? ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “काहीही होऊ…”
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
“जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी अंतिम टप्यात आहे. जर याबाबतचा निर्णय जानेवारीत झाला तर मला वाटतं की मार्च-एप्रिलपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निवडणूक आयोग घेईल असं मला वाटतं. मात्र, सर्वोच्या न्यायालयाने निर्णय दिला तर मार्च-एप्रिल पर्यंत होऊ शकतात”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
महायुतीचा फॉर्म्युला कसा असेल?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा महायुतीचा फॉर्म्युला कसा असेल? यासंदर्भात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत. ते काय निर्णय घेतात, त्यावर आमच्या महायुतीचा निर्णय होईल. आम्ही कोणताही निर्णय राज्यावर लादणार नाहीत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबात कोणताही निर्णय राज्यावरून होणार नाही. मी आता माध्यमांच्या समोर सांगत आहे की महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आमचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी जो निर्णय घेतील तोच निर्णय भारतीय जनता पार्टी करेल”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd