महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परंपरेनुसार शिवाजी पार्कवर होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. शिवसेनेतील भुकंपानंतर आणि राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेल्या या दसरा मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या मेळाव्यांमधून विरोधी गटांवर काय आणि कोणत्या प्रकारे आरोप केले जाणार याची सर्वांमध्ये चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची जी सभा होणार आहे किंवा यापूर्वी ज्या सभा झाल्या त्या टोमणे सभा झाल्या. त्यामध्ये कधी ते महाराष्ट्राच्या हिताचं काही बोललेच नाही. पुन्हा टोमणे सभा होणार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे असे कार्यकर्ते आहेत, जे दिवसाचे १८ तास समर्पित आहेत. ते दोघेही नेहमीच विकासाबाबत विचार करतात. दसरा मेळाव्यात काय अपेक्षित आहे तर, महाराष्ट्राचा सकल विकास कसा होईल, महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर कसा पोहचेल. हे अपेक्षित आहे. परंतु आतापर्यंतच्या दसरा मेळाव्यातील सभांमध्ये केवळ टोमणेच दिसले, टोमणे सभांनी महाराष्ट्राचं भलं होणार नाही.”
“गर्दीची चिंता नाही. एखाद्या कार्यक्रमास किती लोक येतात किती नाही याला महत्त्व नसतं. कार्यक्रमाची मर्यादा, उद्देश, योजना काय हे महत्त्वाचं असतं. उद्धव ठाकरेंच्या आतापर्यंत तुम्ही सभा पाहिल्या मग फेसबुक लाईव्ह किंवा दसरा मेळावा त्या केवळ टोमणे सभा असतात. आताही काय होईल कोण कुठे सभा घेईल हे महत्त्वाचं नाही, महाराष्ट्राला काय मिळणार? महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. महाराष्ट्रला क्रमांक एकवर नेण्यासाठी जे करायला हवं होतं ते केलं नाही. आता ते केवळ टोमणे सभा, कोणाचं नाव घेऊन उलटसुलट बोलणं सुरू आहे. त्या ऐवजी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. विकासासाठी काम करणारं हे नव सरकार आलं आहे. ट्वेंटीट्वेंटी मॅच खेळणारं हे सरकार आहे. हे दोघेही सुपरमॅन आहेत, बुलेट ट्रेन सुसाट सुरू आहे. मी कधीही एकनाथ शिंदेंना पाहतो तर ते विकासाबाबतच बोलत असतात, महाराष्ट्राला क्रमांक एकवर कसं नेता येईल याबाबत बोलत असतात. उद्धव ठाकरेंची सभा ही टोमणे सभाच असणार आहे.”
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या प्रतिष्ठान मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहांतर्गत ७२ हजारांहून अधिक वृक्ष लागवड केली गेली. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर असा हा सेवा सप्ताह होता.