नांदेड : भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी काटेकोर अर्हता निश्चित करून दिल्यानंतर नांदेड जिल्ह्यात महानगराध्यक्ष आणि ग्रामीण भागाच्या दोन जिल्हाध्यक्षांसाठी पक्षात नव्याने आलेले ‘बाद’ झाले असून पक्षात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या महिलांसह अनुसूचित जाती/जमातीतील कार्यकर्त्यांस जिल्हाध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे!
नांदेड जिल्ह्यातील पक्षाच्या बहुतांश मंडळ अध्यक्षांच्या नेमणुका गेल्या आठवड्यात झाल्या. तालुकाध्यक्ष पदाशी समकक्ष असलेल्या या पदासाठी पक्षाने वयाची अट (३५ ते ४५) घालून दिली होती; पण अनेक मंडळांमध्ये या अटीचा भंग करून मंडळ अध्यक्ष नेमण्यात आल्याचे दिसून आले, तरी पक्षाच्या राज्य शाखेने त्याकडे डोळेझाक केल्यामुळे या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब झाले.
आता पुढच्या टप्प्यात पक्षाच्या राज्यातील ७८ संघटनात्मक जिल्ह्यांच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून त्यासाठी पक्षाने जिल्हानिहाय पर्यवेक्षक नियुक्त केले असून या पदावर मंत्री, खासदार-आमदार इत्यादींची नेमणूक झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांचा मोठा गट भाजपावासी झाला असून आपल्या काही समर्थकांची मंडळ अध्यक्षपदी वर्णी लावण्यात चव्हाण यांना यश आले. त्यांच्या निकटवर्तीयांपैकी काही जणांची नावे जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चेत असतानाच पक्षाच्या केंद्रीय संघटनेकडून या पदासाठी नवीन अर्हता आल्यामुळे चव्हाण समर्थकांची नावे बाद झाल्याचे स्थानिक पातळीवर मानले जात आहे.
चव्हाण यांच्यासोबतच भाजपात प्रवेश करणारे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना प्रदेश भाजपाने काही महिन्यांपूर्वी महानगर कार्याध्यक्ष केले. ते आता महानगराध्यक्षपदाचे दावेदार मानले जात असले, तरी नव्या अहर्तेत त्यांचे नाव येऊ शकत नाही. ते पक्षात नवे आहेत तसेच ते दान टर्मचे सक्रिय सदस्य नाहीत आणि वयाच्या अटीतही काठावर आहेत, असे सांगण्यात आले.
जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाच्या प्रदेश परिषद सदस्य निवडीची प्रक्रिया ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश गुरुवारी जारी करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री अतुल सावे आणि भाजपाच्या काही आमदारांत वाद निर्माण झालेला असला, तरी जिल्ह्यातील तीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी पर्यवेक्षक म्हणून सावे यांचीच नेमणूक करण्यात आली आहे.
नांदेड (द.) मध्ये पूनम पवार
पक्षाने महिलांना संधी देण्याचे नव्या अहर्तेद्वारे जाहीर केल्यानंतर नांदेड जिल्हा (दक्षिण) भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी जि.प.च्या माजी सदस्य पूनम पवार यांचे नाव पुढे आले आहे. त्या पक्षाचे जुने नेते (कै.) संभाजी पवार यांच्या स्नुषा आणि विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या पत्नी आहेत. पक्षाने जबाबदारी दिल्यास हे पद सांभाळण्याची त्यांची तयारी आहे.
गायकवाड न्यायाच्या प्रतीक्षेत
दिव्यांग असूनही पक्षामध्ये अनेक वर्षांपासून कृतिशील असलेले मुदखेडचे निष्ठावान कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांनी उत्तर जिल्ह्याचे अध्यक्षपद मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नव्या अहर्तेत अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यास संधी असल्याच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांना पक्षनेतृत्वाने न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भाजपाने आजवर जिल्ह्यात मागासवर्गीय अध्यक्ष केलेला नाही.