राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील बदल्या आणि बढत्यांचा आदेश गृहमंत्रालयाने बुधवारी प्रसिद्ध केला. मात्र १२ तासांच्या आतच यामधील पाच अधिकाऱ्यांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली. मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधिक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह पाच आयपीएस अधिकाऱ्यांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती दिली होती. या सर्वांच्या बढतीला स्थगिती देण्यात आली. एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे ही स्थगिती देण्यात आल्याची चर्चा असताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“बदल्यांमध्ये पसंती, नापसंती हा प्रश्नच उपस्थित होत नाही. सुप्रीम कोर्टाने नियमांच्या चौकटीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कशा कराव्यात याबाबत काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार हा पोलीस महासंचालकाचा अधिकार आहे, एकनाथ शिंदेंचा अधिकार नाही. एकनाथ शिंदे नगरविकास विभागाच्या बदल्या करतात त्या कोणत्या आमदाराला विचारून करतात?,” अशी विचारणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

ठाकरे सरकारकडून १२ तासांच्या आत पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीला स्थगिती; नेमकं काय झालं?

“चांगले पोलीस अधिकारी आले तर आपण अडचणीत येऊ, अशा भावनेतून जर या बदल्या होत असतील आणि गृहमंत्र्यांवर दबाव असेल तर त्यांनी हे गृहमंत्रीपद फेकून द्यावं,” असं आवाहनच यावेळी त्यांनी केलं.

ते अधिकारी कोण आहेत?

राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले, दत्तात्रय शिंदे यांच्या बदलीला गृहमंत्रालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. पत्रामध्ये गृहमंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती देण्यात आल्याचं स्पष्ट केलं आहे.

राजेंद्र माने राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त पदावर कार्यरत होते आणि त्यांना ठाणे शहरात पूर्व प्रादेशिक विभागात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती. तर महेश पाटील यांना पोलीस उपायुक्त पदावरुन मुंबईतील वाहतूक विभागात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली होती.

संजय जाधव पुण्यातील महामार्ग सुरक्षा पथकात पोलीस अधिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची ठाणे शहरात अप्पर पोलीस आयुक्तपदी (प्रशासन) बढती कऱण्यात आली होती. पंजाबराव उगले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून पोलीस मुंबईत अप्पर पोलीस आयुक्तपदी (सशस्त्र पोलीस) बढती देण्यात आली होती. तर दत्तात्रय शिंदे यांनी पालघरमधील पोलीस अधिक्षक पदावरुन मुंबईत अप्पर पोलीस आयुक्तपदी (संरक्षण व सुरक्षा) बढती देण्यात आली होती.

Story img Loader