मुंबईच्या राणीबागेतले पेंग्विन हा पर्यटकांसाठी आणि सामान्य मुंबईकरांसाठी चर्चेचा विषय ठरला होता, तसाच तो राजकीय नेतेमंडळींमध्ये देखील चर्चेचा विषय झाला होता. हे पेंग्विन आणि त्यांच्यावर होणारा खर्च, त्यांची आवश्यकता, त्यांच्यासाठीचा हट्ट अशा बऱ्याच मुद्द्यांवरून राजकीय टोलेबाजी, आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले आहेत. पण आता पुन्हा एकदा पेंग्विनचा मुद्दा चर्चेत आला आहे. आणि यंदा राजकीय आरोपांमुळे नसून थेट राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत याचा संदर्भ आला आहे. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पेंग्विनच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका करताना थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरच खोचक शब्दांत निशाणा साधला आहे!

सुधीर मुनगंटीवारांचा किस्सा!

यावेळी सरकार परीक्षांमध्ये गरीब विद्यार्थ्यांकडून शुल्कापोटी पैसे घेत असून राणीबागेतल्या पेंग्विनवर मात्र कोट्यवधींचा खर्च होत असल्याचा मुद्दा सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. या मुद्द्यावरून टीका करताना मुनगंटीवार यांनी एक किस्सा सांगितला. यामध्ये त्यांना भेटलेल्या एका गरीब विद्यार्थ्याने दिलेल्या उत्तरावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यासंदर्भातला व्हिडीओ मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर देखील शेअर केला आहे.

मरावे आणि पेंग्विन व्हावे!

“मला एक गरीब विद्यार्थी असं म्हणाला की मला नोकरीच मिळत नाही. आत्ता मी १०० रुपये रोजीनं काम करतो. मी म्हटलं चांगले दिवसही येतील ना. तो म्हणाला साहेब मला तर वाटतं की खरंच मरावं आणि राणीबागेच्या पेंग्विनच्या रुपाने जन्म घ्यावा. पण मी विचारलं, असं तुला का वाटतं? तो मला हिशोब सांगत होता, की त्या पेंग्विनवर रोज २० हजार रुपये खर्च होतात. एका तासाला ८३३ रुपये म्हणजे महिन्याला ६ लाख रुपये खर्च होतात”, असं मुनगंटीवार म्हणाले.

“आमची मानसिकता किती भिकारी…”

यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी पेंग्विनवरील खर्चाची तुलना थेट राज्यातील मंत्र्यांच्या पगाराशी केली! “वळसे पाटील साहेब, एवढा पगार तर मंत्री म्हणून तुम्हाला नाही हो. तुमच्यापेक्षा पेंग्विन वरच्या श्रेणीत येतो. कारण मंत्र्याचा पगार २ लाख ५२ हजार किंवा ५३ हजार आहे. पण त्याचा (पेंग्विन) ६ लाख आहे हो. म्हणजे मंत्र्यापेक्षा पेंग्विन पॉवरफुल! १५ कोटी रुपये पेंग्विनवर खर्च होतो. आमची मानसिकता किती भिकारी असावी”, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

“..अशा धंद्यांमुळे पुढच्या निवडणुकीत हे नक्की पडतील”, सुधीर मुनगंटीवारांचा भास्कर जाधव प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना इशारा!

दरम्यान, मुनगंटीवार यांनी त्यांच्या भाषणाचा शेअर केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.