शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर ईडीनं केलेल्या कारवाईवरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. संजय राऊतांनी यावरून भाजपा आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर आगपाखड केली असताना दुसरीकडे भाजपाकडून देखील राऊतांना लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधताना त्यांची तुलना थेट बॉलिवुड अभिनेत्री कंगना रनौत हिच्याशी केली आहे. नागपूरमध्ये बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांसोबत महाविकास आघाडीवर देखील तोंडसुख घेतलं आहे.
“शिशुपालाचे १०० अपराध, तसे महाविकास आघाडीचे…”
शिशुपालाचे १०० अपराध, तशा महाविकास आघाडीच्या १०० समस्या सांगता येतील, असं म्हणतानाच मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीमध्ये एकही व्यक्ती समाधानी नसल्याचं म्हटलं आहे. “महाविकास आघाडीमध्ये एक तरी व्यक्ती समाधानी आहे का? मुख्यमंत्र्यांना वाटतं की गृहमंत्री सूडाच्या भावनेने वागत नाहीत, कारवाई करत नाहीत, अटक करत नाहीत..म्हणून मुख्यमंत्री ते नाराज आहेत. राज्यात अनेक मंत्री असे आहेत की ज्यांना वाटतं ज्या वेगाने आम्हाला पैसे खायचे आहेत, त्या वेगाने खाता येत नाहीत. आमच्या नसत्या कुठेतरी अडकतात. अधिकारी आमचं काम थांबवतात. चार मंत्री मुख्य सचिवांच्या विरोधात तक्रार करायला गेले होते. शिवसेनेचे आमदार म्हणत होते की आम्हाला पैसे मिळत नाहीत. शिवसेनेच्या अनेक खासदारांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादी काय, काँग्रेस काय, शिवसेना काय.. हे नाराज आहेत. मला चिंता आहे की जनता नाराज आहे”, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
“प्रविण दरेकरांना नोटीस देताना सत्यमेव जयते, आणि…”
“संविधानाच्या चौकटीत भाषण स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्य आहे. काही लोकांचा मूळ स्वभाव झालाय की जेव्हा स्वत:ची चूक होते, तेव्हा ते स्वत:च त्या चुकीच्या समर्थनार्थ न्यायाधीश होतात आणि जेव्हा दुसऱ्याची चूक होते, तेव्हा ते त्याविरोधात न्यायाधीश होतात. मला वाटतं की हा दुटप्पीपणा आहे. तुम्ही प्रविण दरेकरांना नोटीस देता, तेव्हा सत्यमेव जयते. आणि आपल्याला नोटीस येते तेव्हा असत्यमेव जयते. हा जो दुटप्पीपणा आहे तो शब्दांच्या रुपाने फुटला आहे. मनातल्या वेदना शब्दातून व्यक्त झाल्या आहेत. संपादक म्हणून महाराष्ट्राचे प्रश्न आता गौण झाले, स्वत:चे प्रश्न महत्त्वाचे झाले आहेत. हे नवं अप्पलपोटे धोरण आहे”, असं देखील मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
“कंगना देखील हेच म्हणाली होती”
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांची तुलना कंगना रनौतसोबत केली आहे. “काही महिन्यांनी किंवा वर्षांनी हा साक्षात्कार झाला. कंगना रनौतचं ऑफिस बुलडोझर चालवून तोडायला निघाले, तेव्हा ती हेच म्हणाली होती की मी कष्ट केले, मेहनत केली. हे कार्यालय बांधलं, त्यात छोट्याशा चुका असू शकतात. पण बुलडोझर घेऊन तुम्ही माझं कार्यालय तोडता. कमीतकमी या घटनेनंतर कंगना रनौत आणि संजय राऊत यांच्या विचारांमध्ये समानता आली हे एक मोठं यश मानलं पाहिजे”, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी लगावला आहे.